अष्टविनायकांपैकी आठवा गणपती श्री बल्लाळेश्वर; निसर्गरम्य पालीत भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर संगम

रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी आठवे गणपती क्षेत्र आहे. अंबा नदी, सुधागड आणि सरसगडाच्या निसर्गरम्य परिसरामुळे पालीची अष्टविनायक यात्रा भक्तीबरोबरच पर्यटनाचा अनुभव देणारी ठरते.

Sep 3, 2026 - 01:21
 0  8
अष्टविनायकांपैकी आठवा गणपती श्री बल्लाळेश्वर; निसर्गरम्य पालीत भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर संगम
पाली बल्लाळेश्वर, श्री बल्लाळेश्वर, अष्टविनायक, अष्टविनायक यात्रा, पाली गणपती, रायगड गणपती, बल्लाळेश्वर मंदिर, सुधागड, सरसगड, अंबा नदी, महाराष्ट्रातील गणपती मंदिरे,

प्रतिनिधी : प्रज्ञा शिंदे 

पालीचा श्री बल्लाळेश्वर : भक्ती, श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम

रायगड : महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रांमध्ये पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपतीला विशेष महत्त्व आहे. अष्टविनायकांपैकी आठवे गणपती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले पाली हे धार्मिक श्रद्धेबरोबरच निसर्गसौंदर्यासाठीही भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण ठरते.

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात हे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. भव्य सुधागड किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य यामुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसराला विशेष सौंदर्य लाभले आहे.

पूर्वाभिमुख मंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती

श्री बल्लाळेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर चिरेबंदी असून येथील गणेशमूर्तीचे विशाल कपाळ हे एक वैशिष्ट्य मानले जाते. गणेशाच्या डोळ्यांमध्ये हिरे असल्याचे सांगितले जाते.

मंदिरात असलेली प्रचंड घंटाही भाविकांचे लक्ष वेधून घेते. ही घंटा चिमाजी अप्पांनी अर्पण केली असल्याचे या क्षेत्राच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

पाली परिसरात धार्मिकतेसोबत पर्यटनाचीही संधी

पाली परिसर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर येथील आजूबाजूचा निसर्गही पर्यटकांना आकर्षित करतो. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे तसेच सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

सुधागडाच्या भव्य पार्श्वभूमीमुळे आणि अंबा नदीच्या सान्निध्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धार्मिक अनुभवासोबतच निसर्गाचा आनंदही घेता येतो.

पालीला जाण्यासाठी विविध मार्ग

पाली हे खोपोलीपासून सुमारे ३८ किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे १११ किलोमीटर अंतरावर आहे.

खोपोली- पेण मार्गावरून पालीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. तसेच पनवेल-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण येथूनही पालीकडे जाता येते.

भाद्रपद चतुर्थीला भरते यात्रा

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला अष्टविनायकांच्या आठही तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेचे वातावरण असते. विविध जाती-धर्मांचे भाविक या ठिकाणी श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात गणेशभक्तांची मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.

अष्टविनायक यात्रा म्हणजे भक्तीसोबत पर्यटन

अष्टविनायक दर्शनासाठी भाविकांना पुणे, अहिल्यानगर आणि रायगड या जिल्ह्यांमधून प्रवास करावा लागतो. अष्टविनायकांतील श्री गणेशाची विविध रूपे आणि प्रत्येक मंदिराचे भौगोलिक वैशिष्ट्य वेगळे आहे.

काही गणेशमंदिरे डोंगरात, काही खडकात तर काही नदीकाठी वसलेली आहेत. त्यामुळे अष्टविनायक यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा न राहता भक्ती, इतिहास, संस्कृती आणि निसर्गपर्यटनाचा अनुभव देणारी यात्रा ठरते.

अष्टविनायकांच्या प्रत्येक क्षेत्राला स्वतंत्र धार्मिक महत्त्व असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेमध्ये या तीर्थक्षेत्रांचे विशेष स्थान आहे. अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतभर पोहोचली आहे.

संकलन : संदिप राठोड

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 3
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.