पिंपरी मतदारसंघातील वीज समस्या महिन्याभरात सोडवा; आमदार अमित गोरखे यांचा महावितरणला अल्टिमेटम
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि प्रलंबित वीज समस्यांवर एका महिन्यात ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार अमित गोरखे यांनी महावितरण प्रशासनाला दिले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २९ जुलै : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वीज समस्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. नागरिकांना होणारा त्रास कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. महावितरण प्रशासनाने एका महिन्याच्या आत विशेष उपाययोजना करून वीजप्रश्न मार्गी लावावेत, असा स्पष्ट इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ जुलै रोजी निगडी प्राधिकरण येथील सावरकर भवनमध्ये उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी विविध भागांतील वीज समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आमदार गोरखे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सुधारणा करण्याचे सक्त निर्देश दिले.
वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
पिंपरी मतदारसंघातील शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, निगडी प्राधिकरण, मोहननगर, मोरवाडी, विद्यानगर आणि आकुर्डी परिसरातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
काही भागांमध्ये सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहणे, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीचे काम उशिराने होणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे, अशा गंभीर समस्या नागरिकांनी बैठकीत मांडल्या. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत आमदार अमित गोरखे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत महत्त्वाचे निर्णय
वीज समस्या तातडीने सोडविण्यासाठी बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रत्येक बुधवारी ‘वीज तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्यात येणार असून, २८ ऑगस्टपर्यंत वीज समस्यांचा विशेष आढावा घेऊन प्रलंबित तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.
वाढत्या वीज मागणीचा विचार करून आवश्यक ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच भविष्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारणीच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांकडून फोनद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
आमदार अमित गोरखे म्हणाले, “नागरिकांचा त्रास कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. वीज हा मूलभूत प्रश्न असून, सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने तातडीने आपली यंत्रणा सुधारली पाहिजे. यासाठी महावितरण प्रशासनाने एका महिन्याच्या आत विशेष उपाययोजना कराव्यात. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण, तक्रार अथवा समस्या असल्यास नागरिकांनी महावितरणच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरण हेल्पलाइन क्रमांक:
☎️ ७८७५७२४०९१
☎️ ७८७५७२४५४९
या बैठकीस उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, नगरसेविका सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, महावितरणचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीनंतर महावितरण प्रशासनाकडून पिंपरी मतदारसंघातील वीज समस्यांवर लवकरच सकारात्मक आणि ठोस कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0