तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि मानवी संवेदनशीलतेच्या संगमातून महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी अभियंता दिन २०२६ कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानासोबत मानवी संवेदनशीलता, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण विचारांचा समन्वय साधण्याचे आवाहन केले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी
“भविष्यातील अभियंता केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारा नसावा; तर तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी करणारा संवेदनशील अभियंता असावा,” असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.
वांद्रे येथील सभागृहात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिन – २०२६ या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अभियंत्यांना संबोधित करत होते.
‘म्हाडा केवळ घरे बांधणारी संस्था नाही’
यावेळी बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले की, “म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो कुटुंबांची स्वप्ने साकार करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया घालणारी देशातील अग्रगण्य गृहनिर्माण संस्था आहे.”
बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि गुणवत्तेची जपणूक हीच म्हाडाच्या कार्याची खरी ओळख असली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत मानवी संवेदनशीलता आवश्यक
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत भाष्य करताना जयस्वाल यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी मानवी विचारशक्ती, भावना आणि संवेदनशीलतेची जागा ती घेऊ शकणार नाही.
तंत्रज्ञान माहितीचे विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेला गती देऊ शकते; मात्र माणूस विचार करण्यासोबतच अनुभवतो, संवेदना जाणतो आणि सहानुभूतीने निर्णय घेतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्यांचे जतन करणे ही भविष्यातील महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील सात ते आठ वर्षे म्हाडासाठी महत्त्वाची
भविष्यातील गृहनिर्माण विकासात अभियंत्यांची भूमिका निर्णायक राहणार असून, पुढील सात ते आठ वर्षे म्हाडासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असणार आहेत, असेही जयस्वाल यांनी नमूद केले.
बदलत्या काळानुसार कार्यपद्धतीमध्ये आवश्यक बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि मानवी संवेदनशीलता यांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी अभियंता वर्गाला केले.
आधुनिक प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा गृहनिर्माण क्षेत्रात वापर
कार्यक्रमात म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत अभियंता वर्गाने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
मुख्य अभियंता अनिल अंकलगी यांनी गुणवत्तापूर्ण काम, वेग आणि अचूकता ही अभियंत्यांच्या कार्यपद्धतीची मूलतत्त्वे असल्याचे सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास संस्थेची कार्यक्षमता अधिक वाढू शकते, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य अभियंता-१ धीरजकुमार पंदिरकर यांनी म्हाडाच्या बांधकाम पद्धतीमध्ये काळानुरूप मोठे बदल झाल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आधुनिक प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञान गृहनिर्माण क्षेत्रातही वापरल्यास बांधकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
यामुळे लाभार्थ्यांना अधिक मूल्यवर्धित आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचा गौरव
अभियंता दिनाच्या कार्यक्रमात पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता राकेश गावित यांनी केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, गुणवत्तापूर्ण बांधकाम, कार्यक्षम कार्यपद्धती आणि नागरिकांप्रती मानवी संवेदनशीलता या बाबींवर भर देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0