अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वांतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’; महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचेही आयोजन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सात दिवसीय विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड २०२६’ आणि १९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहे.

Jul 31, 2026 - 18:03
 0  10
अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वांतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’; महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचेही आयोजन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६, साहित्यरत्न दौड २०२६, महापौर चषक कॅरम स्पर्धा, रवि लांडगे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २८ जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदापासून सात दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांनी ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ साजरे करण्यात येणार आहे. या पर्वांतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड २०२६’ आयोजित करण्यात आली असून, कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ १९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा देखील होणार आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. प्रथमच आयोजित करण्यात येणारी ‘साहित्यरत्न दौड’ अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरेल. तसेच महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमुळे राज्यातील व जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची उत्तम संधी मिळेल, असे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार परिषदेत या उपक्रमांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी ‘साहित्यरत्न दौड’ आणि महापौर चषक कॅरम स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही महापौर लांडगे यांनी केले.

या वेळी आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अनिल घोलप, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुरा शिंदे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, उपआयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

२ ऑगस्ट रोजी ‘साहित्यरत्न दौड’

‘साहित्यरत्न दौड २०२६’ रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही दौड ३ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांत होणार आहे. या दौडीत सुमारे ४ हजारांहून अधिक युवक-युवती आणि नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि सामाजिक एकतेचा संदेश देणे, हा प्रमुख उद्देश आहे.

दौडीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सहभागींसाठी वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा व नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.

१९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसदस्य कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ १९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा २९ ते ३१ जुलै या कालावधीत कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी, चिंचवड येथे होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटातील ४०० हून अधिक कॅरमपटू सहभागी होणार आहेत. विविध गटांतील विजेत्यांना लाखो रुपयांची रोख बक्षिसे तसेच आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कॅरमपटूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार असून, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार आहे. तसेच विचार प्रबोधन पर्वातील विविध परिसंवाद, प्रबोधनपर कार्यक्रम आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमधून अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा व्यापक प्रसार करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.