मुंबईत भारतरत्न के. कामराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण; मुंबई नाडार संगमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
भांडुप (पश्चिम) येथे मुंबई नाडार संगम समाजाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते झाले. याचवेळी भारतरत्न, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक के. कामराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
मुंबईतील भांडुप (पश्चिम) येथील लेख रोड परिसरात मुंबई नाडार संगम समाजाच्या नव्या कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याच कार्यक्रमात भारतरत्न, स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ समाजसुधारक के. कामराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात आले.
मुंबई नाडार संगम समाज गेली अनेक वर्षे शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन आणि विविध प्रकारचे सहकार्य देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे. नव्या प्रशस्त कार्यालयाच्या माध्यमातून हे कार्य आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी के. कामराज यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या त्यांच्या विचारांचा आदर्श घेत मुंबई नाडार संगम समाज समाजोपयोगी कार्य करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला तामिळनाडूतील तिरुनेलवेलीचे खासदार रॉबर्ट ब्रूस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मुंबई नाडार संगम समाजाचे अध्यक्ष राजा इलेंगो, सचिव पॅलेस दुराई, खजिनदार बालन यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच भारतरत्न के. कामराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण झाल्याने हा सोहळा समाजासाठी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरला. शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत मुंबई नाडार संगम समाज आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात कार्य करेल, असा विश्वास खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0