पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची विभागीय रणनीती निश्चित; १ लाख वृक्षारोपणासह मोदी सरकारच्या योजनांचा घराघरांत प्रचार

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची रणनीती निश्चित करण्यात आली. १ लाख वृक्षारोपण, आंतरराष्ट्रीय योग दिन, आणीबाणीच्या ५१ वर्षांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आणि मोदी सरकारच्या योजनांच्या जनजागृतीसह विविध अभियानांवर भर देण्यात आला.

Jun 4, 2026 - 19:17
 0  3
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची विभागीय रणनीती निश्चित; १ लाख वृक्षारोपणासह मोदी सरकारच्या योजनांचा घराघरांत प्रचार
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. ३ जून २०२६ : भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची व्यापक रणनीती निश्चित करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त १ लाख वृक्षारोपण, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन, आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आणि मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जनसंपर्क अभियान अशा विविध उपक्रमांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते, जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वागताध्यक्ष म्हणून भूमिका बजावली.

बैठकीत ‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या राज्यव्यापी अभियानाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त शहरात एका दिवसात किमान १५ हजार झाडे लावण्याचे तसेच संपूर्ण आठवड्यात १ लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याशिवाय २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून विविध योग संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

२५ जून रोजी आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त मंडल स्तरावर व्याख्याने, जनजागृती कार्यक्रम तसेच त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या ‘मिसाबंदी’ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन, चित्रकला स्पर्धा तसेच लाभार्थ्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ तयार करून जनजागृती केली जाणार आहे.

बैठकीत पक्षाच्या SIR (संघटन) नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास ४० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती देत पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “पक्षाचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक उपक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात पिंपरी-चिंचवड शहर राज्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि SIR नोंदणीची प्रगती पाहता शहराने पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले आहे,” असे ते म्हणाले.

या बैठकीस आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनीताई जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले, तर आभार जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0