करिअरसोबत जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा; वसंत नामा गवळी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना विद्यार्थ्यांनी करिअरसह नैतिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवावे, असे आवाहन वसंत नामा गवळी यांनी केले. पिंपरी येथे लिंगायत गवळी समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Aug 10, 2026 - 17:49
 0  7
करिअरसोबत जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा; वसंत नामा गवळी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
वसंत नामा गवळी, लिंगायत गवळी समाज, समाज गौरव पुरस्कार २०२६, लिंगायत गवळी विकास फाउंडेशन,

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पिंपरी, पुणे | दि. ८ ऑगस्ट २०२६

“सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना करिअर घडविण्यासोबतच नैतिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. लिंगायत गवळी समाजातील तरुणाईचा उपयोग सक्षम, सुसंस्कृत आणि सुदृढ समाज उभारणीसाठी झाला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या तरुणांनी आपल्या मागच्या पिढीला योग्य मार्ग दाखवावा,” असे आवाहन महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वसंत नामा गवळी यांनी केले.

पिंपरी येथे शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) लिंगायत गवळी विकास फाउंडेशन यांच्या वतीने “समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतानाच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समाज गौरव

यावेळी विठ्ठल हुच्चे, सोनाली डोईजड, प्रशांत काटकर, संतोष बारसे, भारवी चौधरी, रोशन लंगोटे, श्रुती चौधरी, ॲड. चैताली नामदे, ऋतुजा बहिरवाडे आणि जयकुमार बीडकर यांना “समाज गौरव पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले.

तसेच राजूभाऊ घुगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे होते. यावेळी ग्लोबल टेकक्सीस इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. संभाजी बारसे, प्रा. भालचंद्र हुच्चे, खंडू बहिरवाडे, उमाकांत जोमीवाले, नगरसेविका अरुणाताई लंगोटे, गणेश लंगोटे, सुपाआप्पा पिरनाईक, डॉ. किसन झिपरे, प्रवीण हुंडीवाले, कृष्णा भाऊ गठरी, सुरेश शहापूरकर, बंटीभाऊ घुगरे, सोमनाथ हिरणवळे, भगवान औशीकर, दयानंद श्रीलिंग, राजेंद्र लगडे, भीमराव घुगरे, अशोक आप्पा बहिरवाडे, मधुकर औरंगे, लक्ष्मण बहिरवाडे, पंडित आप्पा शहापूरकर, विठ्ठल उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

परंपरागत व्यवसायासोबत नव्या संधी शोधण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात नारायण बहिरवाडे यांनी गवळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायासमोरील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. गवळी समाजाच्या परंपरागत व्यवसायाला पूर्वीसारखे चांगले दिवस राहिलेले नाहीत. या व्यवसायात विविध सहकारी संस्था तसेच कॉर्पोरेट कंपन्यांची स्पर्धा वाढली आहे.

त्यामुळे नव्या पिढीने परिस्थितीचा विचार करून उच्च शिक्षण घेण्याबरोबरच उद्योग-व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत, असे आवाहन बहिरवाडे यांनी केले.

व्यावसायिक शिक्षणातून आर्थिक उन्नतीचा मार्ग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. संभाजी बारसे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली.

व्यावसायिक शिक्षण घेतल्यास आर्थिक उन्नती साधणे अधिक सुलभ होते. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

लिंगायत गवळी विकास फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्याचे काम पुढेही केले जाईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचेही प्रा. बारसे यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि आयोजन

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकाश चौधरी, वामन काटकर, मधुकर बिडकर, राजेश चौधरी आदींनी विशेष सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. संभाजी बारसे यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर बिडकर यांनी मानले.

लिंगायत गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव झाल्याने हा समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.