कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 34.5 मिमी पाऊस; गगनबावड्यात सर्वाधिक 106.8 मिमी, 17 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 34.5 मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 106.8 मिमी पाऊस पडला. राधानगरी धरण 93 टक्के भरले असून जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 34.5 मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 106.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरण 93 टक्के भरले आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या पावसात गगनबावडा (106.8 मिमी) सर्वाधिक ठरला. त्याखालोखाल आजरा 63.6 मिमी, राधानगरी 53.6 मिमी, चंदगड 41.3 मिमी, भुदरगड 41.2 मिमी, गडहिंग्लज 34.2 मिमी, कागल 31.3 मिमी, पन्हाळा 13.9 मिमी, करवीर 13.3 मिमी, शाहुवाडी 9.4 मिमी, हातकणंगले 3.0 मिमी आणि शिरोळ 2.4 मिमी पावसाची नोंद झाली.
राधानगरी धरणात 93 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून राधानगरी धरणात 7.76 टीएमसी (93 टक्के) पाणी साठले आहे. आज सकाळी 7 वाजेच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन व विद्युत विमोचकाद्वारे 1,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
याशिवाय वारणा धरणात 28.89 टीएमसी (84 टक्के), तुळशी धरणात 2.64 टीएमसी (76 टक्के), दूधगंगा धरणात 14.28 टीएमसी (56 टक्के), कासारी धरणात 80 टक्के, कडवी धरणात 89 टक्के, कुंभी धरणात 74 टक्के पाणीसाठा झाला आहे. घटप्रभा, जांबरे, सर्फनाला आणि कोदे लघुपाटबंधारे शंभर टक्के भरले आहेत.
17 बंधारे पाण्याखाली
सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, कासारी नदीवरील यवलूज व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी आणि राशिवडे, कुंभी नदीवरील सांगरुळ, दूधगंगा नदीवरील दत्तवाड तसेच वारणा नदीवरील चिंचोली आणि माणगाव असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
15 रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित
अतिवृष्टीमुळे 2 राज्य मार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग, 9 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 15 रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीखाली
पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे 26 फूट 6 इंच, शिरोळ येथे 38 फूट 9 इंच आणि नृसिंहवाडी येथे 36 फूट पाणीपातळी नोंदविण्यात आली असून तिन्ही ठिकाणी नदीची पातळी इशारा पातळीखाली आहे.
4.85 लाखांचे नुकसान; प्रशासन सतर्क
आजच्या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ₹4 लाख 85 हजारांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज असून, आतापर्यंतचे एकूण नुकसान ₹2 कोटी 36 लाख 75 हजार 500 इतके असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सध्या जिल्ह्यात कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलेले नाही. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0