महापौर चषक कबड्डी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; राज्यभरातील ८१२ खेळाडूंचा सहभाग

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला भोसरी येथे उत्साहात सुरुवात झाली असून राज्यभरातील ८१२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

May 7, 2026 - 22:30
 0  4
महापौर चषक कबड्डी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; राज्यभरातील ८१२ खेळाडूंचा सहभाग
महापौर चषक कबड्डी स्पर्धा, रवि लांडगे, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ ला भोसरी येथील गावजत्रा मैदानात उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर रवि लांडगे यांनी युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, “कबड्डी हा आपल्या मातीतला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेला खेळ आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी आणि शहरात क्रीडामय वातावरण निर्माण व्हावे, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. पिंपरी चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रातही अग्रस्थानी राहावे यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.”

या उद्घाटन सोहळ्यास आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, पीएमपीएल अध्यक्ष डॉ. महेश आव्हाड, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य योगेश लांडगे, कुंदन गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

राज्यभरातील ८१२ खेळाडूंचा सहभाग

महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १० मेपर्यंत चालणार असून राज्यभरातील नामांकित संघांनी यात सहभाग घेतला आहे. पुरुष गटातील ३६ आणि महिला गटातील २४ संघांसह एकूण ८१२ खेळाडू स्पर्धेत उतरले आहेत. सामने सुरळीत पार पडावेत यासाठी ५५ सामनाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

आमदार महेश लांडगे म्हणाले की, “राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. शहरातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”

आमदार शंकर जगताप यांनी युवकांनी खेळांकडे करिअरच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या स्पर्धेमुळे राज्यभरातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले.

१७ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके

स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष आणि महिला गटातील प्रथम क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी २ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १.५ लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

याशिवाय उपउपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. “दिवसाचा मानकरी”, “उत्कृष्ट चढाई”, “उत्कृष्ट पकड” आणि “अष्टपैलू खेळाडू” या विशेष पुरस्कारांद्वारे उत्कृष्ट खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.