गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. जिल्हाधिकारी कार्यालय व काँग्रेस कमिटी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी, पोस्टरबाजी आणि मोठा गोंधळ झाला.
नाशिक ब्युरो : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच काँग्रेस कमिटी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी करत काँग्रेस तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
जिल्हाधिकारी कार्यालयावरील निदर्शनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक जवळच असलेल्या महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळविला. मोर्चाच्या मार्गात झालेल्या या अचानक बदलामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रवेश करू नयेत तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ धावपळ झाली.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी वेगळ्या मार्गाने काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स उभारून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दोन बाजूंना रोखले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तथा आमदार सरोज अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत असून, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही निवेदन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना संबंधित विधान मागे घेणार नसल्याचे सांगितले. काँग्रेस महिलांचा अपमान करत नसून, वस्तुस्थितीवर आधारित भूमिका मांडत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच महिलांना पंतप्रधानपदापासून ग्रामपंचायत सदस्यपदापर्यंत विविध स्तरांवर संधी दिली असून, महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेसने सातत्याने कार्य केले असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी तीव्र होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासह धरपकडीची कारवाई सुरू केली. यामुळे परिसरात काही काळ मोठा गोंधळ उडाला.
यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन मोठ्या आवाजात घोषणा देत होते. विविध आशयाचे पोस्टर झळकावत एकमेकांच्या भूमिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे ठेवल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले असून, ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0