पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारत आणि निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

Jul 19, 2026 - 02:33
 0  5
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १८ जुलै : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या जिद्द, प्रतिभा आणि लेखणीच्या बळावर मराठी साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. अवघ्या दीड दिवसांच्या शालेय शिक्षणानंतरही त्यांनी साहित्य, शाहिरी, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य उभे केले. त्यांच्या व्यापक विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा प्रत्येकाने जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, अण्णा भाऊ साठे यांनी वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडल्या. न्याय, समता आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. 'फकीरा' या अजरामर कादंबरीतून सामाजिक परिवर्तनाचा विचार त्यांनी मांडला, तर आपल्या शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव देश-विदेशात पोहोचविला.

या अभिवादन कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपायुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी संस्थानचे विश्वस्त अनिल सौदंडे, समरसता गतिविधीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक मुकुंदराव आफळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या समतावादी, मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचारांची आजही समाजाला प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0