पुनावळेतील शाळा आरक्षणाच्या खासगीकरणाला नागरिकांचा विरोध; महापालिकेनेच उभारावी आधुनिक शाळा

पुनावळे येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित जमीन खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिकेने वाकडच्या धर्तीवर स्वतःची आधुनिक आणि परवडणारी शाळा उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

May 12, 2026 - 23:30
 0  1
पुनावळेतील शाळा आरक्षणाच्या खासगीकरणाला नागरिकांचा विरोध; महापालिकेनेच उभारावी आधुनिक शाळा
पुनावळे शाळा आरक्षण, पिंपरी चिंचवड महापालिका, सीबीएसई शाळा, शाळा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पुनावळे येथे माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली सुमारे ०.९१ हेक्टर जमीन खासगी संस्थेला ३० वर्षांच्या दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाविरोधात स्थानिक नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने मुख्यमंत्री कार्यालय, महापालिका आयुक्त, महापौर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाला सविस्तर निवेदन सादर करत या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

फेडरेशनच्या निवेदनानुसार, पुनावळे येथील सर्वे क्रमांक ३८ पै. आणि ४४ पै. मधील ही जमीन विकास आराखड्यात स्पष्टपणे ‘माध्यमिक शाळा’ म्हणून आरक्षित असून ती सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. अशा सार्वजनिक उपयोगाच्या जागेचे खासगीकरण करणे हे नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुमारे ७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात उच्च बाजारमूल्य असलेली ही जागा खासगी संस्थेला ३० वर्षांसाठी देणे हे आर्थिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.

परवडणाऱ्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न

पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आणि लोकसंख्या वाढ होत असून, परवडणाऱ्या शिक्षणाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी खासगी संस्थेमार्फत शाळा सुरू झाल्यास शुल्कवाढ होण्याची शक्यता असून सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढू शकतो, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

‘वाकड मॉडेल’चा दाखला

महापालिकेने वाकड येथे उभारलेल्या अत्याधुनिक सीबीएसई शाळेचा दाखला देत, पुनावळे येथेही त्याच धर्तीवर आधुनिक आणि दर्जेदार शाळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रस्तावाबाबत स्थानिक रहिवासी, पालक, गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या सार्वजनिक आरक्षणाच्या जागेबाबत निर्णय घेताना जनसहभाग आणि सार्वजनिक सुनावणी आवश्यक होती, असे फेडरेशनने नमूद केले.

फेडरेशनच्या प्रमुख मागण्या

पुनावळेतील शाळा आरक्षित जमीन खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा.

महापालिकेने स्वतःच्या निधीतून आधुनिक माध्यमिक किंवा सीबीएसई शाळा उभारावी.

निविदा प्रक्रिया, आर्थिक मूल्यांकन आणि निर्णय प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी.

नागरिक आणि पालकांसाठी तात्काळ सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी.

प्रतिक्रिया

“पुनावळेतील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ही जमीन सार्वजनिक मालमत्ता असून ती नागरिकांच्या भविष्यासाठी राखीव आहे. अशा जागेचे खासगीकरण करणे अन्यायकारक आहे. वाकडप्रमाणे पुनावळे येथेही महापालिकेने आधुनिक आणि परवडणारी सीबीएसई शाळा उभारावी,” असे पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0