आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग आणि विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांची पाहणी; वारकऱ्यांसाठी सुविधा नियोजनाचे निर्देश
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग, मुक्काम आणि विसावा स्थळांची पाहणी करत सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, पार्किंग, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २२ मे २०२६: आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. पालखी मुक्काम, विसावा स्थळे आणि मार्गांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून नियोजनबद्ध काम करावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच मुक्काम आणि विसावा स्थळांची आयुक्तांनी पाहणी केली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत निगडी येथील भक्ती शक्ती चौकात केले जाते. त्यानंतर आकुर्डी येथे मुक्काम असतो. या दोन्ही ठिकाणांची तसेच पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोशी येथील मॅगझीन चौकात केले जाते. त्या परिसरासह संपूर्ण पालखी मार्गाचीही पाहणी करण्यात आली.
पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी पालखी मार्गावरील पाणीपुरवठा, स्वच्छता, फिरती शौचालये, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, दिशादर्शक फलक, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था, खड्डे बुजविणे, धोकादायक होर्डिंग्ज हटविणे आणि पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वारकऱ्यांच्या मुक्काम स्थळी शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आणि अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या.
महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
