आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती; १०२ रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ सुविधेचे उद्घाटन
राज्यातील १०२ रुग्णवाहिका सेवांचे इंधन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम सुरू करण्यात आला. या सुविधेमुळे राज्यातील ३,१९५ रुग्णवाहिकांना कॅशलेस इंधन सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव
मुंबई, दि. ३० : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, सक्षम आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, १०२ रुग्णवाहिका सेवांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ या नाविन्यपूर्ण सुविधेचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कॅशलेस पेट्रोकार्ड उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासह आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
या वेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रतिनिधींनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विश्वासार्ह, पारदर्शक आणि उत्तरदायी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.”
पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व व्यवस्थापन प्रक्रियेत सुलभता येणार असून, आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील. तसेच इंधन उपलब्धतेतील अडथळे कमी होऊन रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावीपणे चालविण्यास मदत होणार आहे.
१०२ रुग्णवाहिका सेवा आता सर्व रुग्णांसाठी
यापूर्वी १०२ रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने माता आणि बालकांसाठी वापरली जात होती. मात्र, आता ही सेवा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करून १०८ रुग्णवाहिका सेवेला पर्यायी व्यवस्था विकसित करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील ३,१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएल कंपनीचे कॅशलेस पेट्रोकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे रुग्णवाहिकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध होण्यास मदत होणार असून, आपत्कालीन आरोग्य सेवेतील विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.
जलद आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवेवर भर
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, विश्वासार्ह आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कॅशलेस पेट्रोकार्ड सुविधेमुळे रुग्णवाहिका व्यवस्थापन अधिक सुलभ, पारदर्शक आणि उत्तरदायी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची आठवण करून देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही नागरिकांसाठी मोठा आधार असल्याचे नमूद केले.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवाभावाने, जबाबदारीने आणि तत्परतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॅशलेस पेट्रोकार्ड उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य सेवा आयुक्त, माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विशेष अभिनंदन केले.
भविष्यातही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0