गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दूध भेसळ प्रकरणी दोघांना अटक, ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोरेगाव (प.) येथे दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, बनावट पिशव्या व भेसळीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.

Jul 15, 2026 - 20:57
 0  11
गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दूध भेसळ प्रकरणी दोघांना अटक, ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त
दूध भेसळ, मुंबई गुन्हे शाखा, गोरेगाव, अमूल दूध, गोकुळ दूध, अन्न व औषध प्रशासन,

मुंबई | ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष ११) गोरेगाव (पश्चिम) परिसरात दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि मोबाईल फोन असा सुमारे ५० हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, गोरेगाव (प.) येथील अंकुर बिल्डिंगजवळील सिद्धिविनायक सेवा मंडळ सोसायटी परिसरात काही व्यक्ती अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार करून नागरिकांना विक्री करत आहेत. या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई केली. 

छाप्यात आरोपी नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या कापून त्यातील काही प्रमाणात दूध बाहेर काढत होते. त्यानंतर त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेले अस्वच्छ पाणी मिसळून त्या पिशव्या पुन्हा सील करून मूळ कंपनीचे दूध असल्याचा भास निर्माण करून विक्रीसाठी तयार केल्या जात असल्याचे उघड झाले. 

कारवाईदरम्यान पोलिसांनी ३९,५०४ रुपयांचे ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, अमूल ताजा व अमूल गोल्डच्या २२४ रिकाम्या पिशव्या, भेसळीसाठी लागणारे साहित्य आणि मोबाईल फोन जप्त केला. जप्त करण्यात आलेले भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू आहे. 

या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दूध भेसळ रॅकेटला मोठा धक्का बसला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1