राजधानीत दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी; ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’च्या तयारीचा मंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा

देशाच्या राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात येणारा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव’ ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे होणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.

Jul 30, 2026 - 22:47
Aug 22, 2026 - 18:43
 0  10
राजधानीत दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी; ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’च्या तयारीचा मंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा
दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६, आशिष शेलार,

प्रतिनिधी | नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. ३० : देशाच्या राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’च्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे जनपथ येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची सांस्कृतिक समृद्धी, वैविध्यपूर्ण आशय आणि दर्जेदार कलाकृती राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दिल्लीच्या सांस्कृतिक विश्वात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा अधिक ठळक करण्यासह मराठी सिनेमाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र सदन येथे झालेल्या आढावा बैठकीस महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, विवेक गर्गे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन सरदारे, अभिजित गोडबोले, रामदास चव्हाणके आणि राजकुमार महाजन उपस्थित होते.

बैठकीत चित्रपट प्रदर्शन, मान्यवरांचे स्वागत, प्रेक्षक व्यवस्थापन, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, तांत्रिक सुविधा, प्रसिद्धी, सुरक्षा व्यवस्था तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महोत्सवाचे आयोजन उच्च दर्जाचे, सुयोग्य नियोजनबद्ध आणि संस्मरणीय व्हावे, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलार यांनी संबंधितांना दिल्या.

‘सिनेमा • संस्कृती • संवाद’ या संकल्पनेवर महोत्सव

‘सिनेमा • संस्कृती • संवाद’ या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय महोत्सव मराठी चित्रपटांच्या आशयवैविध्याची ओळख देशभरातील रसिकांना करून देणारा ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवरील दर्जेदार चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद - २’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने होणार आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त केलेल्या ‘स्थळ’ आणि ‘घबाडखुंड’ यांसह विविध दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

इतर भाषिक प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटांचा आशय आणि कलात्मकता समजून घेता यावी, यासाठी महोत्सवातील सर्व चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषेची मर्यादा ओलांडून देशभरातील विविध भाषिक रसिकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचण्यास मदत होणार आहे.

कलाकार आणि तंत्रज्ञांशी थेट संवादाची संधी

चित्रपट प्रदर्शनाबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील विविध पैलू, सर्जनशील अनुभव आणि मराठी चित्रपटसृष्टीसमोरील संधी व आव्हाने याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधील भीम सभागृहात महोत्सवाचा उद्घाटन आणि समारोप सोहळा तसेच प्रमुख चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. नालंदा सभागृहात पटकथा लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या विषयांवरील मास्टरक्लास व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच समरसता सभागृहात माहितीपट आणि लघुपटांचे प्रदर्शन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. चित्रपट निर्मिती, लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवोदितांसाठीही या कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहेत.

प्रवेश विनामूल्य; ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मात्र, महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेला २९ जुलैपासून प्रारंभ झाला असून, अधिकृत संकेतस्थळ अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून रसिकांनी आगाऊ नोंदणी करून आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राजधानी दिल्लीमध्ये प्रथमच आयोजित होणारा हा महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देणारा ठरेल. दर्जेदार चित्रपट, कलाकारांशी संवाद, मास्टरक्लास, कार्यशाळा आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव’ मराठी सिनेप्रेमींसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.