ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी क्रिकेट स्पर्धा; खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश
विक्रोळी येथे ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असे आवाहन खासदार संजय दिना पाटील यांनी केले.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : वाढत्या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे तसेच समाजात ड्रग्जविरोधी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने स्व. दिना बामा प्रतिष्ठान आणि सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळीतील टागोर नगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेला क्रिकेटप्रेमी, स्थानिक नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना “ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार” असा सामाजिक संदेश देण्यात आला.
आजच्या घडीला वाढते अमली पदार्थांचे प्रमाण हे समाजासमोरील गंभीर आव्हान बनले असून अनेक युवक व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा मिळावी आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत युवकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. समाजात वाढत्या ड्रग्ज समस्येविरोधात कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
ईशान्य मुंबई परिसरात अमली पदार्थांच्या समस्येविरोधात विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवकांमध्ये जनजागृती, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अधिक दक्षता आणि अवैध अमली पदार्थ व्यवहारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार पाटील यांनी पुढे सांगितले की, क्रिकेटसारख्या खेळांच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून अनेक गुणवंत खेळाडूंना अशा उपक्रमांमधून संधी निर्माण होत आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अंतिम सामन्यावेळी मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी या उपक्रमाचे कौतुक करत ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज व्यक्त केली.
स्व. दिना बामा प्रतिष्ठान आणि सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांना सकारात्मक दिशा देणारा आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0