३०० कोटी वृक्षलागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम होईल – वनमंत्री गणेश नाईक
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे उद्घाटन करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ३०० कोटी वृक्षलागवड अभियानातून महाराष्ट्र अधिक हरित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई, दि. ५ : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड मां के नाम’ या अभियानातून देशभरात वृक्षारोपणाची लोकचळवळ निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी ३०० कोटी वृक्षलागवड अभियानामुळे महाराष्ट्र अधिक हरित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचे भूमिपूजन तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार वाहनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री नाईक म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या परिणामांमुळे पर्यावरण संरक्षणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत राज्य शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांना जंगलातच पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी जांभूळ, पेरू, फणस यांसारख्या फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच डोंगरवस्त्या आणि पाड्यांमध्ये देवराई व वनराई निर्मितीलाही प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या विनंतीनुसार सामाजिक वनीकरण विभागामार्फत मुंबईसाठी एक लाख वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वन कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच वनविभागासाठी विविध माध्यमांतून निधी उभारणीचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात आमदार मनीषा चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. आमदार प्रकाश सुर्वे यांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर आमदार संजय उपाध्याय यांनी इंधन बचत आणि सायकल वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली.
आमदार प्रवीण दरेकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वन विभागात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आधुनिक सुविधा विकसित करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा यांनी राज्यातील टिश्यू कल्चर केंद्रांमधून दीड कोटी दर्जेदार रोपांची निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी प्रास्ताविकात उद्यान हे मुंबईचे ‘फुफ्फुस’ असल्याचे सांगत ३४ हेक्टर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीचे जंगल विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पर्यावरण शिक्षण आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वन कर्मचाऱ्यांना जंगलातील कामकाजादरम्यान स्वसंरक्षणासाठी उपयुक्त विशेष किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0