भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील उद्योग, शेतकरी आणि निर्यातदारांना नवी संधी; ब्रिटनमध्ये मसाले व कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ
भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील मसाले, मूल्यवर्धित कृषी उत्पादने, उद्योग आणि निर्यातदारांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या संधींचा लाभ घेण्यासाठी राज्य शासन जनजागृती आणि मार्गदर्शन करणार आहे.
मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे
भारत-यूके मुक्त व्यापार करार (India-UK Free Trade Agreement) अंमलात आल्यानंतर महाराष्ट्रातील मसाले, मूल्यवर्धित कृषी उत्पादने, उद्योग आणि निर्यातदारांसाठी ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून या ऐतिहासिक कराराचा लाभ राज्यातील उद्योग, उद्योजक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन विशेष जनजागृती आणि मार्गदर्शन मोहीम राबविणार आहे.
या करारामुळे उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पणन विभाग इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने उद्योग, निर्यातदार, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जागतिक व्यापार करारांचा प्रभावी लाभ घेणारे अग्रगण्य राज्य ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
भारत-यूके व्यापाराला नवी गती
कार्यक्रमात बोलताना ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी सांगितले की, भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र हा देशातील प्रमुख औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असल्याने येथील उद्योगांनी या करारातून निर्माण झालेल्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या करारामुळे भारतातून यूकेला निर्यात होणाऱ्या ९९ टक्के वस्तूंवरील तसेच यूकेमधून भारतात आयात होणाऱ्या ९० टक्के वस्तूंवरील सीमाशुल्क कमी किंवा पूर्णपणे शून्य होणार आहे. त्यामुळे द्विपक्षीय व्यापारात मोठी वाढ होऊन दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रालाही लाभ
हरजिंदर कांग यांनी सांगितले की, 'यूके-इंडिया व्हिजन २०३५' अंतर्गत व्यापाराबरोबरच शिक्षण, हवामान बदल, संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. या कराराचा जास्तीत जास्त लाभ उद्योग आणि उद्योजकांपर्यंत पोहोचावा यासाठी ब्रिटिश उप उच्चायुक्तालय सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतीकात्मक कार्गो बॉक्सचे अनावरण
या कार्यक्रमात भारतातून यूकेकडे निर्यात होणाऱ्या वस्तू आणि यूकेतून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे प्रतीकात्मक कार्गो बॉक्स अनावरण करण्यात आले. या माध्यमातून भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे वाढणाऱ्या द्विपक्षीय व्यापाराचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी भारत-यूके मुक्त व्यापार करारातील तरतुदी, उद्योगांना मिळणाऱ्या संधी आणि भविष्यातील व्यापारवृद्धीबाबत सविस्तर माहिती दिली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0