इंडियन ऑइलच्या CSR निधीतून नायर रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर; आरोग्य सेवांना तंत्रज्ञानाची जोड

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधीतून मुंबईतील बी.वाय.एल. नायर रुग्णालय आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

May 22, 2026 - 23:08
 0  12
इंडियन ऑइलच्या CSR निधीतून नायर रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर; आरोग्य सेवांना तंत्रज्ञानाची जोड
इंडियन ऑइल CSR, नायर रुग्णालय, बीवायएल नायर हॉस्पिटल, बायोकेमिस्ट्री ब्लड

मुंबई, दि. २१ : मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबईसारख्या महानगरात सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

नायर रुग्णालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री अॅनालायझरमुळे तपासणी अहवाल मिळण्याचा कालावधी कमी होणार असून डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारासंदर्भात जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली ही यंत्रणा मोठ्या प्रमाणातील नियमित आणि तातडीच्या बायोकेमिकल तपासण्या अधिक वेगाने व अचूकतेने करण्यास सक्षम आहे. २४ तास कार्यरत असलेल्या सेंट्रल पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही प्रणाली बसविण्यात आल्यामुळे नमुन्यांच्या तपासणीची क्षमता वाढणार आहे.

टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल या मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय संस्था असून बायोकेमिस्ट्री विभाग वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. आधुनिक स्वयंचलित यंत्रणेमुळे प्रयोगशाळेची कार्यक्षमता, तपासण्यांची अचूकता आणि अहवाल वितरणाचा वेग आणखी सुधारण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी CSR माध्यमातून योगदान देणाऱ्या उद्योग समूहांचे कौतुक केले. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यामुळे राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होत असून अशा उपक्रमांमुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0