मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे जुहू समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहीम तीव्र; दहा दिवसांत १,८०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाहून आलेला कचरा हटविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली असून मागील दहा दिवसांत १,८०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे
मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे समुद्रातून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुहू समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सध्या दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात असून, मागील दहा दिवसांत तब्बल १ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे.
मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी आकर्षक ठेवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका सातत्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवत असते. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला १,००० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून गेला. भरतीच्या लाटांमुळे हाच कचरा पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याने स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ आणि यांत्रिक साधनसामग्री तैनात केली आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांनीही जुहू समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले असून उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे.
सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या दररोज जवळपास ३५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. त्यापैकी महानगरपालिका दररोज सुमारे १८० मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावत आहे.
अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात
नेहमीच्या स्वच्छता व्यवस्थेत २ बीच क्लिनिंग मशिन्स, २ बॉबकॅट्स, १० डंपर्स, १ जेसीबी आणि दोन सत्रांमध्ये कार्यरत १५० स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतात. या यंत्रणेद्वारे साधारण ६० मेट्रिक टन कचरा हटविला जातो.
मात्र, यंदाच्या पावसाळ्यात कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महानगरपालिकेने अतिरिक्त स्वरूपात १ बीच क्लिनिंग मशिन, २ बॉबकॅट्स, ५ डंपर्स, १ जेसीबी, २ ट्रॅक्टर-ट्रॉली, २ पोकलेन मशिन्स आणि दोन सत्रांमध्ये ९० अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे कचरा हटविण्याच्या कामात लक्षणीय वेग आला आहे.
स्वच्छता मोहीम अखंड सुरू
सध्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने दिवसभर स्वच्छता मोहीम सुरू असून संकलित कचरा तात्काळ प्रक्रिया केंद्रात पाठवून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. भरतीमुळे पुन्हा किनाऱ्यावर येणारा कचरा त्वरित हटविण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकर तसेच पर्यटकांना समुद्रकिनारा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पावसाळ्यात नाले, गटारे आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा टाकू नये, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केले आहे. मुंबईचे सागरी पर्यावरण आणि भावी पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0