संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जयंतीनिमित्त ‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोग; 21 जुलै रोजी दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात रंगणार भक्तीचा सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘माऊली’ या संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन 21 जुलै 2026 रोजी दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिरात करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्य, अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी प्रवास या नाट्यप्रयोगातून उलगडणार आहे

Jul 13, 2026 - 21:44
 0  1
संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जयंतीनिमित्त ‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोग; 21 जुलै रोजी दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात रंगणार भक्तीचा सोहळा
संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जयंतीनिमित्त ‘माऊली’ संगीतमय

मुंबई | प्रतिनिधी : संदीप गिरकर 

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त भक्ती, अध्यात्म आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा दिव्य अनुभव देणारा ‘माऊली’ हा विशेष संगीतमय नाट्यप्रयोग येत्या 21 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता मुंबईतील श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास संगीत, अभिनय, नृत्य आणि प्रभावी रंगमंचीय सादरीकरणातून उलगडला जाणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक ज्ञान, अध्यात्म आणि भक्तीच्या बळावर समाजाला समता, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ आणि ‘पसायदान’ यांसारख्या त्यांच्या अमर साहित्यकृती आजही समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या ठरत आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा त्यांचा सार्वकालिक संदेश आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारा मानला जातो.

‘माऊली’ या संगीतमय नाट्यप्रयोगामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे अध्यात्म, भक्तिमार्ग, समाजप्रबोधन तसेच मानवतेचा संदेश प्रभावी नाट्यरूपातून सादर केला जाणार आहे. संगीत, नृत्य, अभिनय आणि आधुनिक रंगमंचीय तंत्रज्ञानाचा संगम असलेला हा कार्यक्रम संतपरंपरेचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या समृद्ध संतपरंपरेचे, सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, वारकरी, कला रसिक, विद्यार्थी, संशोधक तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वरांच्या कालातीत विचारांचा आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.