एलआयसीच्या ६८ जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाची बैठक
मुंबईतील एलआयसी मालकीच्या ६८ जुन्या व धोकादायक उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा आणि एलआयसी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रक्रिया गतीने राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. ९ मे २०२६ : मुंबई शहरातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मालकीच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यकारी निदेशक (संपदा) मिता खरे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई शहरात एलआयसीच्या मालकीच्या एकूण ६८ उपकरप्राप्त इमारती असून त्या फोर्ट, गिरगाव, माटुंगा आणि दादर परिसरात आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या संख्येने निवासी आणि अनिवासी भाडेकरू वास्तव्यास असून अनेक इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. रहिवाशांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी या इमारतींचा पुनर्विकास आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
१७६४ भाडेकरूंचे पुनर्वसन केंद्रस्थानी
या ६८ इमारतींमध्ये एकूण ८१५ निवासी आणि ९४९ अनिवासी असे मिळून १७६४ भाडेकरू व रहिवासी वास्तव्यास आहेत. बैठकीदरम्यान इमारतींची सद्यस्थिती, भाडेकरूंच्या पुनर्वसनाची आवश्यकता, पुनर्विकास प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुनर्विकास प्रक्रियेत रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देत सुरक्षित, आधुनिक आणि शाश्वत निवास व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एलआयसीकडून पुनर्विकासाची तयारी
एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्वतःच्या मालकीच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास संस्था इच्छुक असल्याचे सांगितले. या प्रक्रियेसाठी म्हाडाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन संजीव जयस्वाल यांनी दिले.
मुंबईतील एलआयसीच्या इमारतींपैकी फोर्ट येथे ३९, गिरगाव येथे १८, माटुंगा येथे ३ आणि दादर येथे ८ इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींच्या पुनर्विकासामुळे रहिवाशांना सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0