‘मी रमाई’ एकपात्री नाट्यप्रयोगातून रमाईंच्या त्यागमय जीवनाला पिंपरी-चिंचवडमध्ये भावपूर्ण अभिवादन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मी रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून रमाईंच्या संघर्ष, त्याग आणि समर्पणमय जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. अभिनेत्री प्रियांका उबाळे यांच्या सशक्त अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ३० एप्रिल २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘मी रमाई’ हा एकपात्री नाट्यप्रयोग नागरिकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) परिसरातील मोकळ्या जागेत सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. मराठी अभिनेत्री प्रियांका उबाळे यांनी रमाईंच्या जीवनातील संघर्ष, त्याग, समर्पण आणि सामाजिक योगदान रंगमंचावर अत्यंत प्रभावी पद्धतीने उभे केले.
या नाट्यप्रयोगात रमाईंच्या बालपणातील गरिबी, शिक्षणाचा अभाव, लहान वयात आलेल्या जबाबदाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाहानंतरचा कठीण संसार यांचे वास्तववादी चित्रण करण्यात आले. आर्थिक संकटे, सामाजिक उपेक्षा आणि कौटुंबिक संघर्ष सहन करत रमाई यांनी बाबासाहेबांना दिलेली साथ प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी ठरली.
विशेषतः बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना रमाई यांनी केलेला संघर्ष, मुलांच्या मृत्यूचे दु:ख सहन करतानाही न खचणारी त्यांची जिद्द आणि “तुम्ही शिकत राहा, मी सगळं सहन करते” हा संदेश प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला.
समाजातील अस्पृश्यतेचे अनुभव, बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत रमाईंचे अप्रत्यक्ष योगदान आणि त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातील वेदना यांचे सादरीकरणही हृदयस्पर्शी ठरले. “महापुरुष घडवणारी शक्ती कोण?” हा प्रश्न उपस्थित करत स्त्रियांच्या अदृश्य योगदानाची जाणीव या नाट्यप्रयोगातून करून देण्यात आली.
या कार्यक्रमास नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘रमाई सृष्टी’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम नव्या पिढीपर्यंत रमाईंच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख करून देणारा ठरला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0