पद आणि लेटरहेडचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही; गैरवर्तन करणाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई – खासदार श्रीरंग बारणे
शिवसेनेच्या पदाचा आणि पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पक्षातून हकालपट्टीही केली जाईल, असा इशारा शिवसेना उपनेते आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २६ मे : शिवसेनेच्या पदाचा किंवा पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिवसेना उपनेते तथा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.
खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे राज्यातील जनतेसाठी सातत्याने काम करत असून नागरिकांचा पक्षावर विश्वास आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
काही पदाधिकारी पक्षाचे चिन्ह असलेल्या लेटरहेडचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लेटरहेडवर पत्रव्यवहार करून तसेच माहितीचा अधिकार कायद्याचा वापर नागरिकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
खासदार बारणे म्हणाले की, "पक्षाचे पद आणि अधिकार यांचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे आणि नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य टाळावे."
नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. अशा तक्रारींची पडताळणी करून संबंधितांविरोधात पक्ष स्तरावर कठोर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी यापूर्वीही पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेना संघटनेची प्रतिमा जपण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने वागावे, असे आवाहनही खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0