मुंबईतील पदपथ कायमस्वरूपी स्वच्छ, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवा; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबईतील पदपथ स्वच्छ, सुरक्षित, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नियमित पाहणी व तातडीने कारवाई करण्याचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश. स्वच्छता व्यवस्थापनात सातत्यपूर्ण सुधारणा करण्यावर भर.

Jul 29, 2026 - 21:37
 0  5
मुंबईतील पदपथ कायमस्वरूपी स्वच्छ, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवा; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
मुंबई स्वच्छता, अश्विनी भिडे, पदपथ स्वच्छता, अतिक्रमणमुक्त पदपथ, बृहन्मुंबई महानगरपालिका,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

मुंबई : नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ पादचारी वाहतुकीसाठी पदपथ अत्यंत महत्त्वाचे असून, ते कायमस्वरूपी स्वच्छ, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही संबंधित यंत्रणांची प्राथमिक जबाबदारी आहे. पदपथांवर कचरा, अनधिकृत वस्तू, बांधकाम साहित्य किंवा फेरीवाल्यांमुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियमित पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी स्वच्छता व्यवस्थेच्या पाहणी दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात एफ दक्षिण विभागातील जीजीभॉय गल्ली येथील स्वच्छता चौकी तसेच परळ येथील आयकर कार्यालयासमोरील स्वच्छता चौकीला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पादचारी सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पदपथांवरील अडथळ्यांवर तातडीने कारवाई करा

पदपथांवर अनधिकृत वस्तू, बांधकाम साहित्य, फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारे अडथळे किंवा कचरा साचल्यामुळे नागरिकांच्या पादचारी वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सातत्याने देखरेख ठेवण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या.

पदपथांवरील अतिक्रमणे आणि इतर अडथळे वेळोवेळी हटविण्यासोबतच त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण निरीक्षण व्यवस्था राबवावी. नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि सुलभ पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य रस्ते, हमरस्ते आणि शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांची स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीचा वापर करून संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेवर सातत्याने देखरेख ठेवावी. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उच्च राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमितपणे कामकाजाचे परीक्षण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

स्वच्छता व्यवस्थापनातील सुधारणा ही निरंतर प्रक्रिया

परिमंडळ उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एम पूर्व आणि एफ दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंते आणि कार्यरत चमू सार्वजनिक स्वच्छता, कचरा संकलन तसेच कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांच्या निर्मूलनासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे श्रीमती भिडे यांनी नमूद केले.

प्रत्येक विभागाची लोकसंख्या, भौगोलिक रचना आणि स्थानिक समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. त्यामुळे मध्यवर्ती यंत्रणेमार्फत सर्वसाधारण नियोजन आणि व्यवस्था केली जात असली, तरी प्रत्येक विभागाच्या स्थानिक गरजा आणि सूक्ष्म स्तरावरील अडचणी संबंधित विभागीय चमूला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, असे त्यांनी सांगितले.

यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रत्येक विभागातील सूक्ष्म स्तरावरील समस्यांचा सखोल अभ्यास करावा. संबंधित विभागीय चमूशी समन्वय साधून स्थानिक गरजांनुसार परिणामकारक उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

स्वच्छता व्यवस्थापनातील सुधारणा ही एकदाच पूर्ण होणारी प्रक्रिया नसून ती सातत्याने सुरू ठेवावी लागते. शहरातील स्वच्छता, कचरा संकलन आणि संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन यासाठी निरंतर प्रयत्न आवश्यक असल्याचे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.