मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मविप्रच्या ५१२ शाखांमध्ये २,२०० वृक्षांची लागवड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील ५१२ शाखांमध्ये एकाच दिवशी सुमारे २,२०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.
नाशिक | ब्यूरो
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा व्यापक संदेश देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. बुधवार, २२ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व ५१२ शाखांमध्ये एकाच दिवशी सुमारे २,२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या मविप्र संस्थेच्या नाशिक जिल्ह्यात नर्सरीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या ५१२ शाखा कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, तंत्रनिकेतन, औषधनिर्माणशास्त्र, नर्सिंग, फिजिओथेरपी महाविद्यालये, आयटीआय, आश्रमशाळा, वसतिगृहे आणि विविध शैक्षणिक शाखांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक शुभेच्छा देण्याऐवजी समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शाखेत विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून वृक्षारोपण करण्यात येणार असून सर्व शाखाप्रमुखांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, कडूनिंब, जांभूळ, करंज, आवळा आणि बहावा यांसारख्या देशी, पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. केवळ वृक्षारोपणावर भर न देता प्रत्येक रोपाचे संगोपन, नियमित पाणी, संरक्षक कुंपण, खत व्यवस्थापन आणि 'वृक्ष दत्तक' उपक्रमाद्वारे निगा राखण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय प्रत्येक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, जैवविविधता, हवामान बदल आणि वृक्षांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, वृक्षसंवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, तालुकानिहाय संचालक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि हजारो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. जिल्हाभरात एकाच दिवशी होणाऱ्या या व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.
'पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल'
मविप्र संस्था शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, आरोग्य जनजागृती, रक्तदान आणि विविध जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही २,२०० वृक्षांची वृक्षलागवड मोहीम पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्यास निश्चितच हातभार लावेल, असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0