नायर रुग्णालयातील अत्याधुनिक 'अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा संकुल' कार्यान्वित; २४x७ आपत्कालीन उपचारांना नवी दिशा

बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित नायर रुग्णालयातील अत्याधुनिक अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Casualty–EMS) संकुल १३ जुलै २०२६ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. दोन मजली, पूर्णतः वातानुकूलित या संकुलामध्ये ट्रायज वॉर्ड, ८ खाटांचा ईएमएस वॉर्ड, २१ खाटांचा ऑब्झर्व्हेशन वॉर्ड, मायनर ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, ब्लड कलेक्शन रूम, डिसास्टर स्टोअर आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Jul 13, 2026 - 22:05
Jul 13, 2026 - 22:07
 0  9
नायर रुग्णालयातील अत्याधुनिक 'अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा संकुल' कार्यान्वित; २४x७ आपत्कालीन उपचारांना नवी दिशा
नायर रुग्णालय, अपघात विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा,

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयातील अत्याधुनिक 'अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Casualty–EMS) संकुल' सोमवार, १३ जुलै २०२६ पासून कार्यान्वित करण्यात आले. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) यांनी निर्धारित केलेल्या मानकांनुसार उभारण्यात आलेले हे संकुल मुंबईतील आपत्कालीन आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेविका अमरिन अब्राहनी, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार तसेच अन्य मान्यवरांनी नवीन संकुलाची पाहणी करून ते कार्यान्वित केले.

लोकार्पण सोहळा नियोजित असला तरी कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय दुखवट्यामुळे उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला. मात्र, नागरिकांच्या आरोग्यसेवेची तातडीची गरज लक्षात घेऊन संकुलातील वैद्यकीय सेवा तत्काळ सुरू करण्यात आल्या.

NMC मानकांनुसार आधुनिक सुविधा

नायर रुग्णालय विस्तार योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले हे संकुल 'प्राईम प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट'चा महत्त्वाकांक्षी भाग आहे. यामध्ये भविष्यात ऑन्कोलॉजी (कर्करोग) इमारत, निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) निवासस्थान आणि एल-आकाराच्या नवीन इमारतीचाही समावेश आहे.

इमारतीचे बांधकाम पूर्ण करून सर्व आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) मिळाल्यानंतर २५ जून २०२६ रोजी हे संकुल रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. यानंतर जुन्या अपघात विभागाची इमारत पाडून त्या जागी २० मजली आधुनिक RMO निवासस्थान उभारण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने सेवा सुरू

रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पूर्णतः वातानुकूलित या संकुलातील सेवा दोन टप्प्यांत सुरू करण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात अपघात विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा (EMS), ट्रायज वॉर्ड, बालरोग विभाग, अस्थिव्यंगोपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग आणि मायनर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक आपत्कालीन निदान व तपासणी सुविधा (Emergency Diagnostic Services) सुरू करण्यात येणार आहेत.

तळ मजल्यावरील सुविधा

रुग्णांची तातडीने नोंदणी, तपासणी आणि उपचारासाठी तळ मजला विकसित करण्यात आला आहे. येथे योजना नोंदणी कार्यालय, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर (CMO) कक्ष, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, बालरोग व अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांचे स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत.

याशिवाय मायनर ऑपरेशन थिएटर, 'गोल्डन अवर'मध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ८ खाटांचा ईएमएस वॉर्ड, एक्स-रे रूम, रुग्णांसाठी डीकंटॅमिनेशन रूम, कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम तसेच 'ब्रॉट डेड' रुग्णांसाठी स्वतंत्र शवगृह क्षेत्राची सुविधा उपलब्ध आहे.

पहिल्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापनावर भर

पहिल्या मजल्यावर दीर्घकालीन रुग्ण निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

मोठ्या दुर्घटना किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत अनेक रुग्णांना एकाच वेळी उपचार देता यावेत यासाठी २१ खाटांचा ट्रायज व ऑब्झर्व्हेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

तसेच प्रयोगशाळेतील तपासण्यांसाठी ब्लड कलेक्शन रूम, अतिरिक्त सल्लागार कक्ष आणि मोठ्या आपत्तीच्या वेळी आवश्यक औषधे, उपकरणे व वैद्यकीय साहित्याचा साठा ठेवण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन सज्जता केंद्र (Disaster Store) उभारण्यात आले आहे.

मुंबईकरांसाठी दिलासा

२४ तास कार्यरत राहणाऱ्या या अत्याधुनिक संकुलामुळे अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना जलद, सुरक्षित आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि प्रगत उपचार व्यवस्थेमुळे नायर रुग्णालयाची आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार असून मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.