आषाढी एकादशीचा भक्तिमय जल्लोष; नाशिकमध्ये दिंडी, विठ्ठल चित्रकला आणि ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ कार्यक्रमाचे आयोजन
आषाढी एकादशीनिमित्त नाशिकमध्ये विविध ठिकाणी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. मविप्र संस्थेच्या शाळांमध्ये दिंडी व सांस्कृतिक उपक्रम, तर ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २४ जुलै : आषाढी एकादशीनिमित्त नाशिक शहरात विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचा उत्साह, विठ्ठल भक्ती आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संगम या उपक्रमांमधून पाहायला मिळाला.
जनता विद्यालयात फळ्यावर साकारली विठू माऊली
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गांधीनगर येथील जनता विद्यालयाचे कलाशिक्षक कृष्णा जाधव यांनी मुख्याध्यापक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील फळ्यावर रंगीत खडूंच्या साहाय्याने वारकऱ्यांच्या दिंडीसह विठ्ठल-रुक्मिणीचे आकर्षक चित्र रेखाटले. या कलाकृतीने विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
आदर्श शिशुविहारमध्ये उत्साहात दिंडी सोहळा
मविप्र संस्थेच्या आदर्श शिशुविहार, वाघ गुरुजी शाळेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी वेशभूषेत सहभागी झाले. मविप्र संचालक लक्ष्मण लांडगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय कोशिरे, सदस्य हिरामण सोनवणे आणि मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे भव्य रिंगणही पार पडले.
‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ भक्तिमय मैफिल
आषाढी एकादशीचे औचित्य साधून ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने सलग १६ व्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश दृष्टीहीन कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमात सारेगम फेम शास्त्रीय गायिका मधुरा बेळे या प्रमुख आकर्षण असणार असून त्यांना ज्येष्ठ तबलावादक सतीश पेंडसे साथ देणार आहेत. तसेच संवादिनीवर जगदीश कुंभार, तबल्यावर संदीप बच्छाव, व्हायोलिनवर भगवान पवार, ऑक्टोपॅडवर सुशील केदारे आणि मृदुंगावर स्वप्नील व दीपिली हे कलाकार सादरीकरण करणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी रसिकांनी या विनामूल्य भक्तिसंगीत मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमादरम्यान काही दृष्टीहीन बांधवांना मदतीचे वाटपही करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0