पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद; नाशिक जिल्हा परिषदेत सोमवारी पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘ब्रेक’

नाशिक जिल्हा परिषदेत इंधन बचतीसाठी प्रत्येक सोमवारी पेट्रोल-डिझेल वाहनांचा वापर टाळण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सायकल, पायी आणि सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार केला जात आहे.

May 25, 2026 - 20:41
 0  15
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद; नाशिक जिल्हा परिषदेत सोमवारी पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘ब्रेक’
नाशिक जिल्हा परिषद, पेट्रोल डिझेल बचत, नरेंद्र मोदी आवाहन, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संवर्धन, सायकल वापर

नाशिक ब्युरो : इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक जिल्हा परिषदेत प्रत्येक सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या खासगी वाहनांचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमाला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी पायी, सायकलने, सार्वजनिक बस सेवा किंवा शेअर रिक्षाच्या माध्यमातून कार्यालयात पोहोचले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी स्वतः निवासस्थानापासून पायी चालत कार्यालयात येऊन या उपक्रमाचे नेतृत्व केले. तर जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सायकलद्वारे कार्यालय गाठत इतरांसमोर आदर्श निर्माण केला.

कार्यालयापासून दूर अंतरावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला. तर नियमित सायकलिंग करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी सायकलने प्रवास करून इंधन बचतीस हातभार लावला.

यावेळी काही कर्मचाऱ्यांनी केवळ सोमवारीच नव्हे, तर नियमितपणे सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशासमोरील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जबाबदारीची भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अलीकडच्या काळात शहरांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यातून इंधनाचा वाढता वापर आणि प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक, सायकल वापर आणि पायी चालण्याची सवय वाढविणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीही सुरू असून या उपक्रमाला भविष्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधणारा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0