सुनेत्राताईंवरील टीकेचे समर्थन करणारे संजय राऊत ‘ढोंगी गुड्डा’; नवनाथ बन यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याचे समर्थन केल्याप्रकरणी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ‘ढोंगी गुड्डा’ असा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठा गटावरही निशाणा साधला.

Aug 5, 2026 - 22:00
 0  3
सुनेत्राताईंवरील टीकेचे समर्थन करणारे संजय राऊत ‘ढोंगी गुड्डा’; नवनाथ बन यांचा घणाघात
नवनाथ बन, संजय राऊत, सुनेत्रा पवार, गुंगी गुडिया, ढोंगी गुड्डा, भाजप, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते,

मुंबई, दि. ५ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधण्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगत काँग्रेसच्या वक्तव्याचे समर्थन करणारे खासदार संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी जोरदार टीका केली. एका महिलेबाबत अशा प्रकारचे वक्तव्य होत असताना खेद व्यक्त करण्याऐवजी त्याचे समर्थन करणे योग्य नसल्याचे सांगत, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात सातत्याने ढोंगाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना, “अशाच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही हिणविणार असाल, तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे ‘ढोंगी गुड्डा’ आहेत,” असा प्रहार केला.

सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्ती म्हणून नव्हे, तर उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्यात आली, असे संजय राऊत सांगत असतील, तर हाच न्याय इतर सर्व प्रकरणांनाही लावला पाहिजे, असे बन यांनी म्हटले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर व्यक्ती म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राचे नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

अभिनेत्री कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली होती, असा आरोप करत बन यांनी सवाल उपस्थित केला. “त्यावेळी व्यक्ती आणि पद यातील फरक तुम्हाला आठवला नव्हता का?” असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, मोहित कंबोज यांच्या घरावर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती, तेव्हाही त्यांनी व्यक्ती म्हणून नव्हे, तर तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती, असा दावा बन यांनी केला.

पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. लोकशाही मार्गाने निषेध करणे किंवा चर्चा करणे अपेक्षित असताना हल्ला का करण्यात आला, असा सवाल करत त्या घटनेचे समर्थन करणार का, अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

सुनेत्रा पवार या सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असतात, असे सांगत बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातत्याने जनतेमध्ये राहून काम करतात. त्यामुळे घरात कोण बसते आणि लोकांचे प्रश्न कोण सोडवते, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

“टपोरी कोण आहे, खंडणीखोर कोण आहे, सुपारी घेण्याचे आणि दलालीचे काम कोण करते, हे महाराष्ट्राला माहिती आहे,” अशा शब्दांत बन यांनी विरोधकांवर टीका केली. भाजप आणि तत्कालीन शिवसेनेची २५ वर्षांची युती ही हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित होती, असे सांगत त्यांनी उबाठा गटाच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती. भाजपनेही २५ वर्षे हिंदुत्वाच्या विचारासाठी युती कायम ठेवली. मात्र, आज उबाठा गटाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे?” असा सवाल बन यांनी केला.

उबाठा गटाने हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्याशिवाय त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करत बन यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. “तुम्हाला आता हिंदू प्रिय राहिले नसून ‘जनाब’ प्रिय झाले आहेत. जोपर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्हाला बुंदी मिळणार नाही, तर खडेच खावे लागतील,” असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत यांनी यापूर्वी स्वप्नाताई पाटकर यांच्याबाबत वापरलेल्या भाषेचाही मुद्दा बन यांनी उपस्थित केला. महिलांबाबत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला देणाऱ्या संजय राऊत यांनी स्वप्नाताई पाटकर यांच्याविषयी कोणते शब्द वापरले होते आणि कोणती भाषा वापरली होती, हे महाराष्ट्राने पाहिले व ऐकले असल्याचे त्यांनी म्हटले.

“संजय राऊत दररोज सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवीगाळ करतात आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतात. ही भाषा योग्य आहे का?” असा सवाल करत, त्यांच्या भाषाशैलीला महाराष्ट्रातील जनता वैतागली असल्याची टीकाही नवनाथ बन यांनी केली.

सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता भाजप आणि उबाठा गटातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.