अतिक्रमणांना थारा नाही; मोकळ्या जागांवर मैदाने आणि हरित क्षेत्र विकसित करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण नियंत्रण, नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्व तयारीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मोकळ्या जागांवर खेळाची मैदाने आणि हरित क्षेत्र विकसित करण्यावर भर देण्यात आला.

May 19, 2026 - 14:22
 0  2
अतिक्रमणांना थारा नाही; मोकळ्या जागांवर मैदाने आणि हरित क्षेत्र विकसित करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ विजय सूर्यवंशी, अतिक्रमण कारवाई,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आणि अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शहराच्या नियोजनात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयुक्त कार्यालयात डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शहर विकासकामे, अतिक्रमण नियंत्रण, पावसाळ्यापूर्व तयारी, नालेसफाई तसेच विविध विभागांमधील समन्वयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, अजय सूर्यवंशी, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सिताराम बहुरे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, शहराच्या नियोजनावर परिणाम करणारी बेकायदा बांधकामे वेळेत रोखली नाहीत तर भविष्यात गंभीर नागरी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून नव्याने सुरू होणाऱ्या बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम निदर्शनास येताच कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई करावी.

कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून त्या ठिकाणी मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करावीत तसेच वृक्षलागवड करून हरित क्षेत्र निर्माण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नालेसफाईची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारी नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून पाण्याचा नैसर्गिक निचरा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत शहरातील पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना, विविध भागांतील पाणी समस्यांचे निराकरण, कामगार कट्ट्यांचे नियोजन, संभाव्य पूर व्यवस्थापन, उद्यानांची देखभाल, रस्त्यांच्या दुभाजकांमधील वृक्षसंवर्धन तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0