संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ चित्ररथ सहभागी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांमध्ये साक्षरता आणि शिक्षणाचा संदेश पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Jul 9, 2026 - 05:44
 0  3
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ चित्ररथ सहभागी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

केंद्र शासनाच्या उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे.

हा चित्ररथ आकुर्डी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांमध्ये साक्षरता, शिक्षणाचे महत्त्व आणि निरक्षरता निर्मूलनाचा संदेश पोहोचविणार आहे. यासाठी शिक्षण विभागाचे १० कर्मचारी संपूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी होऊन विविध जनजागृती उपक्रम राबविणार आहेत.

या चित्ररथाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतदादा पाटील विद्यामंदिर येथे करण्यात आले. यावेळी उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील, उपसंचालक वंदना वावळ, गणपत मोरे, सहाय्यक संचालक सतीश चौधरी, शिक्षण उपनिरीक्षक रमेश चव्हाण तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, "संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ या चित्ररथामुळे शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे वारकऱ्यांपर्यंत पोहोचेल. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून ‘अक्षर विश्व’ उपक्रमाद्वारे पिंपरी-चिंचवड शहर शंभर टक्के साक्षर करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, "‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ ही संकल्पना अत्यंत स्तुत्य असून पालखी सोहळ्यात सहभागी होणारी शिक्षकांची टीम शिक्षण आणि साक्षरतेचा संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे."

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा आणि भक्तीच्या महासागरात शिक्षणाचा संदेश पोहोचविणारा हा अभिनव उपक्रम राज्यातील साक्षरता चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0