कुदळवाडीतील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करा; आरपीआयचे अजीज शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरातील मंदिर आणि मशिदीवर केलेल्या कारवाईविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) आक्रमक झाली आहे. धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आरपीआयचे राज्याध्यक्ष अजीज शेख यांनी केली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरात मंदिर आणि मशिदीवर केलेल्या कारवाईनंतर शहरातील वातावरण तापले असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) ने या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाचे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजीज शेख बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, शहर सरचिटणीस बाबा सरोदे, गजानन घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अजीज शेख यांनी प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर आक्षेप घेत सांगितले की, कोणतीही पूर्वसूचना न देता आणि धार्मिक भावना विचारात न घेता ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने धार्मिक स्थळांमध्ये बूट-चपला घालून प्रवेश केल्याने पावित्र्य भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला.
“शुक्रवारी मुस्लिम समाज मशिदीत नमाज अदा करतो, तर शनिवारी हनुमान मंदिरात पूजा-अर्चा केली जाते. अशा संवेदनशील दिवशी कारवाई करून दोन समाजांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप त्यांनी केला.
धार्मिक स्थळे विकासकामात अडथळा ठरत असतील, तर प्रशासनाने संबंधितांना विश्वासात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यासाठी चर्चा करायला हवी होती. “आम्ही स्वतः प्रशासनाला सहकार्य केले असते. मात्र, राजकीय दबावाखाली अचानक पाडकाम करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” असेही ते म्हणाले.
आरपीआयने महापालिकेकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये पाडण्यात आलेली धार्मिक स्थळे स्वखर्चाने पुन्हा बांधून देणे, कारवाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करणे आणि कारवाईमुळे बेरोजगार झालेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, कुदळवाडी परिसरात बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांच्या नावाखाली कारवाई करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात एकही बांगलादेशी नागरिक आढळून आला नसल्याचा दावा अजीज शेख यांनी केला.
विकास आराखड्यावरील हजारो हरकतींचा निकाल महापालिका प्रशासनाने तातडीने लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. “संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही या अन्यायाविरोधात शांततामय पण ठाम आंदोलन करू. न्याय मिळेपर्यंत गणपती आरती आणि मशिदीत नमाज पठण करून विरोध नोंदवला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, आमदार महेश लांडगे यांना निवेदन देऊन मंदिर आणि मशिदीची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0