‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १२ मे २०२६ :
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान युवा पिढीपर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘शिवरूद्र शंभुराजे’ हे भव्य महानाट्य अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाची, राष्ट्रनिष्ठेची आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची जाज्वल्य गाथा उलगडणाऱ्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगाच्या प्रारंभी आमदार अमित गोरखे बोलत होते.
यावेळी नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सागर तापकीर, राजेंद्र घावटे, संजय कुरबेट्टी, हेमा पारिसकर, जितेंद्र छाबडा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, प्रभागातील नगरसदस्य आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सामाजिक संघटनांचा मोलाचा सहभाग असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपरी चिंचवड शहरात इतिहास घडविणारा आणि ऐतिहासिक ठरणारा हा सांस्कृतिक उपक्रम सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने भविष्यातही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
१० ते १४ मे २०२६ या कालावधीत चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाअंतर्गत ११ ते १३ मे २०२६ दरम्यान शिपस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान निर्मित ‘शिवरूद्र शंभुराजे’ या महानाट्याचे सादरीकरण होत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले हे महानाट्य ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे लिखित व दिग्दर्शित असून प्रतिक चंद्रकांत दाभाडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.
तीन मजली भव्य रंगमंच, २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग, थरारक लढाईचे प्रसंग तसेच महाराष्ट्रातील विविध लोककलांचा समावेश असलेल्या या महानाट्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनप्रवास प्रभावीपणे सादर करण्यात येत आहे.
संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस शिवशंभो उद्यानासमोरील मोकळ्या मैदानात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रंगत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, स्वराज्याच्या विचारांचे संवर्धन करणे आणि इतिहासाबाबत जनजागृती घडवून आणणे हा या महानाट्याच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
गुरुवार दि. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच सकाळी १०.४५ वाजता बर्ड व्हॅली येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहीरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे “छत्रपती संभाजी महाराज – एक अद्वितीय योद्धे” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0