टीबीमुक्त मुंबई’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ; सायन रुग्णालयात महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न
सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानाचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटप, हँडहेल्ड एक्स-रे संयंत्र वितरण तसेच क्षयरोग निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. 26 मे 2026 : महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘टीबीमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात (सायन रुग्णालय) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात धारावी येथील लोकनेते श्री. एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात करण्यात आली. येथे क्षयरोग (टीबी) रुग्णांना राज्यपाल, महापौर, उपमहापौर आणि मान्यवरांच्या हस्ते पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. तसेच, टीबी निदान प्रक्रिया अधिक प्रभावी आणि जलद करण्यासाठी हँडहेल्ड एक्स-रे संयंत्राचे वितरण देखील करण्यात आले.
‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे यांनी या उपक्रमाचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार श्री. सुनील शिंदे, आमदार श्री. कॅप्टन आर. तमिल सेल्वन, शिक्षण समिती अध्यक्षा सौ. राजेश्री शिरवडकर, बाजार व उद्यान समिती उपाध्यक्ष श्री. भास्कर शेट्टी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, आरोग्य अधिकारी, आशा सेविका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईला क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0