रंगावलीतून उलगडणार ‘विश्वगुरू भारत’ची गौरवगाथा; ४ सप्टेंबरपासून नाशिकमध्ये राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शन
विश्वगुरू भारत’ या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय भव्य रांगोळी प्रदर्शन ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान नाशिकच्या ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढा, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रभावनेचे दर्शन रंगावलीतून घडणार आहे.
नाशिक ब्यूरो : रंगांच्या नाजूक रेषा, आकर्षक आकार आणि कलात्मक कल्पनाशक्तीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे वैभव, परंपरेची श्रीमंती, आध्यात्मिक वारसा आणि राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गाथा उलगडणारा अनोखा कलाविष्कार नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा उत्सव समितीतर्फे ‘विश्वगुरू भारत’ या संकल्पनेवर राज्यस्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन ४ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाची माहिती गुरुपौर्णिमा उत्सव समितीचे प्रदेश संयोजक लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
४ सप्टेंबरला प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रदर्शनाचे उद्घाटन ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नागरिकांसाठी हे प्रदर्शन ४, ५ आणि ६ सप्टेंबर या तीनही दिवशी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
राज्यभरातील कलाकार आणि रंगावलीप्रेमींनी साकारलेल्या रांगोळ्यांमधून भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेपासून आधुनिक, सामर्थ्यशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास साकारण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीची हजारो वर्षांची परंपरा केवळ ग्रंथ किंवा इतिहासाच्या पानांपुरती मर्यादित नसून ती लोककलेतही प्रभावीपणे प्रतिबिंबित होते. याच भावनेतून ‘विश्वगुरू भारत’ ही संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पाच विषयांतून साकारले भारताचे विविध पैलू
या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी पाच विषय देण्यात आले होते. त्यामध्ये —
भारतीय गुरु-शिष्य परंपरा
भारताची संरक्षण सिद्धता
भारतीय अस्मितेचे मानबिंदू
आत्मनिर्भर भारतासाठी पंचपरिवर्तन
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र – ‘वंदे मातरम्’
या पाचपैकी एका विषयावर स्पर्धकांनी रांगोळी साकारली आहे.
स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी तसेच इयत्ता ११ वीपासून पुढील खुला गट अशा दोन गटांमध्ये सहभागाची संधी देण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाला रांगोळी साकारण्यासाठी ४ बाय ४ फूट जागा देण्यात आली होती, तर कलाकृती पूर्ण करण्यासाठी तीन तासांचा कालावधी देण्यात आला.
स्पर्धेतील सहभाग विनामूल्य होता. रांगोळी साकारण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणले असून, यांत्रिक साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली होती.
खुल्या गटातील विजेत्याला २१ हजारांचे बक्षीस
स्पर्धेत सहभागी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थी गटात :
प्रथम क्रमांक – ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक – ७ हजार रुपये
तृतीय क्रमांक – ५ हजार रुपये
उत्तेजनार्थ – २ हजार रुपये व सन्मानचिन्ह
तर खुल्या गटात :
प्रथम क्रमांक – २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक – ११ हजार रुपये
तृतीय क्रमांक – ७ हजार रुपये
उत्तेजनार्थ – ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह
अशा प्रकारे कलाकारांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही गटांमध्ये आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख
रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, राष्ट्रभावना आणि भारताच्या वैभवशाली परंपरेचा परिचय नव्या पिढीला व्हावा, तसेच कलाकारांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश समितीच्या सहसंयोजक सौ. अर्चना डेहनकर, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले, महापौर हिमगौरी आडके, डॉ. भारतीताई पवार, माधवी नाईक, रोहिणी नायडू, आ. मंगेश चव्हाण, बाळासाहेब सानप, विजय साने, ज्येष्ठ रांगोळी कलाकार नीलेश देशपांडे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले, सुनील केदार, गणेश गिते, आ. गोकुळ गिते, नीलेश बोरा, मच्छिंद्र सानप, विपुल मेहता यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
कुटुंबीयांसह प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
नाशिककरांनी कुटुंबीयांसह या अनोख्या रंगोत्सवाला भेट द्यावी आणि विविध रंग, रेषा व कलात्मक मांडणीतून साकारलेली भारताच्या गौरवाची गाथा अनुभवावी, असे आवाहन लक्ष्मण सावजी यांनी केले आहे.
ठिकाण : ठक्कर डोम, त्र्यंबक रोड, नाशिक
दिनांक : ४ ते ६ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
3
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0