यूकेच्या ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटीमध्ये शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा
यूकेमधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि यूकेमधील प्रसिद्ध ॲबरिस्टविथ विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पिंपरी येथे पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षण, संशोधन, विद्यार्थी आणि प्राध्यापक विनिमय कार्यक्रम यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
यूकेमधील ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभागाचे सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनकारी शैक्षणिक भागीदारी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पीसीईटीसोबत दृढ नाते निर्माण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.
२०२५ मध्ये दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. त्यानंतरच्या पुढील टप्प्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत ॲबरिस्टविथ विद्यापीठाच्या प्रादेशिक व्यवस्थापक सामंथा वॅलिन, सल्लागार झफीर आलम तसेच पीसीईटीच्या वतीने ओएसडी डॉ. योगेश भावसार, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. निरुपमा कोचेरलाकोटा आणि शुभांगी रामटेके यांनी सहभाग घेतला.
या भागीदारीअंतर्गत संयुक्त शैक्षणिक संशोधन, परदेशातील उच्च शिक्षण, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, अल्पकालीन अभ्यासक्रम, उन्हाळी शाळा उपक्रम, विद्यार्थी-प्राध्यापक विनिमय, क्रेडिट हस्तांतरण आणि इंटर्नशिपसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.
ॲबरिस्टविथ विद्यापीठ हे जागतिक स्तरावर शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनासाठी ओळखले जाते. त्यामुळे या सहकार्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0