अधिकमासानिमित्त डोंबिवलीत भव्य विष्णू पंचायतन याग; १०८ जोडप्यांचा सहभाग
अधिक ज्येष्ठ महिन्याच्या निमित्ताने डोंबिवली येथे तीन दिवसीय भव्य विष्णू पंचायतन यागाचे आयोजन करण्यात आले आहे. देशस्थ शुक्ल यजुर्वेदी पुरोहितांचे वेदविज्ञान मंडळ आयोजित या धार्मिक सोहळ्यात १०८ जोडपी सहभागी होणार असून सामूहिक विष्णुसहस्त्रनाम पठण, हवन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्म | अध्यात्म | ठाणे जिल्हा
मनिषा गुरव | चीफ एडिटर
अधिकमासानिमित्त डोंबिवलीत तीन दिवसीय भव्य विष्णू पंचायतन याग; विश्वकल्याणासाठी विशेष आयोजन
डोंबिवली : अधिक ज्येष्ठ महिन्याचे औचित्य साधून डोंबिवली येथे भव्य विष्णू पंचायतन यागाचे आयोजन करण्यात आले आहे. देशस्थ शुक्ल यजुर्वेदी पुरोहितांचे वेदविज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित हा तीन दिवसीय धार्मिक सोहळा डोंबिवली पूर्व येथील जगदीश बँक्वेट हॉलमध्ये पार पडणार आहे.
या यागामध्ये पहिल्या दिवशी १०८ जोडपी सहभागी होणार असून संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी जगदीश शेठ कारिया आणि त्यांच्या परिवाराने स्वीकारली आहे. शनिवार, ६ जून रोजी सकाळी ७ वाजता गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
प्रथम दिवशी स्वस्तिपुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, पंचांग कर्म, प्रधान देवता स्थापना, नवग्रह पूजन, ग्रहयज्ञ, हवन तसेच तुळशी अर्चना आणि कुंकुमार्चन असे विविध धार्मिक विधी पार पडतील. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सामूहिक विष्णुसहस्त्रनाम पठणाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर महाआरती आणि प्रसाद वितरण होणार आहे.
रविवार, ७ जून रोजी सकाळी अभिषेक पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. दिवसभर होम-हवन सुरू असताना सायंकाळी ७ वाजता महेश विष्णुबुवा शुक्ल अधिक मासाचे धार्मिक महत्त्व स्पष्ट करणारे प्रवचन करणार आहेत.
सोमवार, ८ जून रोजी सकाळी देवता पूजन आणि हवनानंतर सुमारे साडेअकरा वाजता पूर्णाहुती दिली जाईल. समारोप सोहळ्यात यज्ञाचार्य कृष्णचंद्र पुराणिक आणि कर्माचार्य बाळकृष्ण जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिकमासाचे धार्मिक महत्त्व
कर्माचार्य बाळकृष्ण जोशी यांनी अधिकमासाविषयी माहिती देताना सांगितले की, सुमारे तीन वर्षांनी एकदा येणारा हा महिना ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दीपदान, यज्ञ, जप, दानधर्म आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा कालखंड अत्यंत पुण्यदायी मानला जातो.
समाजोपयोगी कार्यातही मंडळाचा सहभाग
वेदविज्ञान मंडळ धार्मिक उपक्रमांसोबतच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्यही सातत्याने करत असल्याचे बाळकृष्ण जोशी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल कुलकर्णी, लक्ष्मण पुराणिक, महेश शुक्ल, दिनेश उपासनी, प्रशांत गायधनी, केदार पारेकर, महेश जोशी, संदीप उपासनी, यज्ञेश जोशी, चंद्रकांत जोशी आणि महेंद्र पंडित यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. प्रमुख चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचार्य कृष्णचंद्र पुराणिक आणि कर्माचार्य बाळकृष्ण जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा विष्णू याग संपन्न होणार आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0