वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन; दोन गृहनिर्माण संस्थांविरोधात महापालिकेची कठोर कारवाई
मुंबईतील वृक्षांना इजा पोहोचवणे आणि मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दोन गृहनिर्माण संस्थांविरोधात पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. ३ ऑगस्ट २०२६ : मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. वृक्षांना इजा पोहोचवणे तसेच महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटीच्या परिसरातील वृक्षांना इजा पोहोचवल्याप्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि विकासकाविरोधात कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील १०० हून अधिक वृक्षांची मंजूर परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याचे आढळून आल्याने संबंधित संस्थेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृक्षांना विषारी इंजेक्शन दिल्याची तक्रार
मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ डीजीएम शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी आहे. या गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाइन तक्रार महापालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागाकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारासोबत संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत सुमारे २० ते २२ छिद्रे पाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. या छिद्रांमध्ये विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचेही प्रथमदर्शनी आढळून आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
तसेच, गृहनिर्माण संस्थेच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील एक झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आढळून आले. संबंधित झाडांना हानी पोहोचविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने महापालिकेच्या वतीने संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
यानुसार महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ सह कलम २१ अन्वये कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
१०० हून अधिक वृक्षांची परवानगीपेक्षा जास्त छाटणी
घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या आवारातील १०० हून अधिक वृक्षांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी करण्यात आल्याची तक्रार महापालिकेच्या ‘एन’ विभागाकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीनंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. वृक्षांच्या छाटणीसाठी महानगरपालिकेकडून विशिष्ट अटी आणि मर्यादांसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीमध्ये मंजूर परवानगीच्या कक्षेबाहेर जाऊन अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी करण्यात आल्याचे आढळून आले.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही वृक्षाची तोड, छाटणी किंवा वृक्षाला इजा करण्यापूर्वी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच परवानगी देताना निश्चित करण्यात आलेल्या अटी आणि मर्यादांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरोधात कायद्यानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेडविरोधातही संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत नाही – डॉ. अविनाश ढाकणे
मुंबईतील वृक्ष हे महानगराच्या पर्यावरणीय समतोलाचे अत्यंत महत्त्वाचे घटक असून, वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला.
डॉ. ढाकणे म्हणाले, “कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये किंवा इंजेक्शन देणे, झाडांची अनधिकृत तोड करणे अथवा झाडे नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.”
“अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित महापालिका विभागाला माहिती देऊन वृक्ष आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा विकासकाविरोधात यापुढेही नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील हरित आच्छादन आणि पर्यावरणीय समतोल टिकविण्यासाठी वृक्षांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून, वृक्षसंवर्धन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून पुढेही कठोर पावले उचलली जाणार आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0