उघडे, तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर आढळल्यास त्वरित तक्रार करा; बृहन्मुंबई महानगरपालिकेचा स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट सुरू

मुंबईतील उघडे, तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर तसेच गटाराच्या झाकणांशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट (९३२४५००६००) सुरू केला आहे. नागरिकांना 'माय बीएमसी मार्ग' ॲप, व्हॉट्सॲप, संकेतस्थळ आणि १९१६ हेल्पलाईनद्वारेही तक्रारी नोंदविता येणार आहेत.

Jul 13, 2026 - 20:49
 0  13
उघडे, तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर आढळल्यास त्वरित तक्रार करा; बृहन्मुंबई महानगरपालिकेचा स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिका, BMC, मॅनहोल, WhatsApp चॅटबॉट

मुंबई प्रतिनिधी  | देवानंद शिंदे 

मुंबई, दि. १३ जुलै २०२६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारींची जलद नोंदणी आणि त्वरित निवारणासाठी अधिक सक्षम व पारदर्शक तक्रार व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. उघडे, तुटलेले अथवा गायब झालेले मॅनहोल कव्हर, गटाराच्या झाकणांशी संबंधित समस्या तसेच इतर नागरी तक्रारी आता विविध डिजिटल माध्यमांतून सहजपणे नोंदविता येणार आहेत.

महानगरपालिकेने विशेषतः उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यासंदर्भातील तक्रारींसाठी स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट (९३२४५००६००) सुरू केला आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांनी संबंधित क्रमांकावर संदेश पाठवून संवाद सुरू करावा. त्यानंतर "तक्रार सबमिट करा" हा पर्याय निवडून घटनास्थळाचे लोकेशन शेअर करावे आणि समस्येचे छायाचित्र अपलोड करावे. तक्रार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.

'माय बीएमसी मार्ग' ॲपवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

नागरिकांनी प्रथम 'माय बीएमसी मार्ग' ॲपवर मोबाईल क्रमांक व ओटीपीद्वारे लॉग-इन करावे. त्यानंतर 'नवीन नोंदणी (New Registration)' हा पर्याय निवडून तक्रारीचा प्रकार निवडावा. आवश्यक असल्यास समस्येचे संक्षिप्त वर्णन लिहावे आणि संबंधित ठिकाणाचे छायाचित्र किंवा जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करावे. तक्रार सादर केल्यानंतर तक्रार नोंदणी क्रमांक प्राप्त होतो.

इतर माध्यमांतूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा

'माय बीएमसी मार्ग' आणि स्वतंत्र मॅनहोल WhatsApp चॅटबॉट व्यतिरिक्त नागरिकांना महानगरपालिकेच्या WhatsApp चॅटबॉट (८९९९२२८९९९), अधिकृत संकेतस्थळ तसेच १९१६ हेल्पलाईनद्वारेही तक्रारी नोंदविता येतात.

WhatsApp चॅटबॉटवर तक्रारीचे ठिकाण आणि छायाचित्र पाठवून तक्रार करता येते. खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी "खड्डा" किंवा "ख", तर मॅनहोलसंदर्भातील तक्रारीसाठी "मॅनहोल" किंवा "म" असा संदेश पाठवावा.

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर 'नागरिकांकरिता → अर्ज करा → तक्रारी → सर्व' या पर्यायाद्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच १९१६ हेल्पलाईनवर संपर्क साधूनही तक्रार नोंदविता येते.

ज्या तक्रारींसाठी छायाचित्र आवश्यक आहे, त्या प्रकरणांमध्ये जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र लिंक पाठविण्यात येते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर तसेच इतर धोकादायक नागरी समस्या आढळल्यास तात्काळ उपलब्ध तक्रार माध्यमांचा वापर करून माहिती द्यावी. विशेषतः मॅनहोलसंदर्भातील तक्रारींसाठी स्वतंत्र WhatsApp चॅटबॉट (९३२४५००६००) चा वापर करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.