क्रेडाई नाशिक मेट्रोकडून कामगारांसाठी स्किल अँड एक्सलन्स सेंटर; कामगार दिनी भूमिपूजन

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे बांधकाम कामगारांच्या कौशल्यविकासासाठी आणि सदस्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चांदशी शिवार येथे ‘क्रेडाई स्किल अँड एक्सलन्स सेंटर’ उभारले जाणार आहे. १ मे रोजी कामगार दिनानिमित्त या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Apr 30, 2026 - 19:07
Apr 30, 2026 - 19:08
 0  2
क्रेडाई नाशिक मेट्रोकडून कामगारांसाठी स्किल अँड एक्सलन्स सेंटर; कामगार दिनी भूमिपूजन

नाशिक ब्यूरो: बांधकाम क्षेत्रात सातत्याने नवीन तंत्रज्ञान येत असून गुणवत्तापूर्ण कामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. बांधकाम क्षेत्राचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या कामगारांच्या कौशल्यविकासासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने चांदशी शिवार येथे ‘क्रेडाई स्किल अँड एक्सलन्स सेंटर’ उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन १ मे रोजी सकाळी ११ वाजता कामगार दिनानिमित्त होणार आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या तसेच बांधकाम कामगारांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, शोभाताई बच्छाव, आमदार राहुल ढिकले, सीमाताई हिरे, देवयानी फरांदे, सरोज अहिरे, राहुल आहेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

३३,५०० चौरस फूट जागेत उभारणार आधुनिक केंद्र

गंगापूर रोडजवळील जलालपूर, चांदशी शिवार येथे सुमारे ३३,५०० चौरस फूट जागेत हे सेंटर उभारण्यात येणार आहे. येथे सुसज्ज क्रेडाई कार्यालय, कार्यशाळा, सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली.

त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा मिळेल. प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होईल तसेच कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.

वास्तुरचनेत ब्रह्मगिरी पर्वतरांगेची प्रेरणा

या सेंटरचे सल्लागार अहमदाबादचे सुप्रसिद्ध वास्तुविशारद मथारू आर्किटेक्ट आहेत. डिझाईन टीममध्ये माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर आणि कृणाल पाटील यांचे योगदान आहे.

माजी अध्यक्ष आर्किटेक्ट कृणाल पाटील यांनी सांगितले की, हे सेंटर नाशिकच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल आणि शहराला नवी ओळख मिळवून देईल.

सेंटरची वैशिष्ट्ये

एकूण परिसर ३३,५०० चौरस फूट

मल्टीपर्पज हॉल, आर्ट गॅलरी, कॅफे आणि ॲम्फी थिएटर

ब्रह्मगिरी पर्वतरांगेपासून प्रेरित वास्तुरचना

परस्पर जोडलेल्या ब्लॉक्समधून पर्वतरांगांचे प्रतिबिंब

पर्यावरणपूरक उपाययोजना

आयजीबीसी प्लॅटिनम रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न

कौशल्यविकासासाठी आधुनिक सुविधा

नेट झिरो इमारत संकल्पना

१ ते ७ मे दरम्यान कामगार कल्याण सप्ताह

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १ ते ७ मे या कालावधीत शहरात कामगार कल्याण सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच कामगारांसाठी कौशल्य उन्नती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर आणि सुरक्षा साहित्य वाटपही केले जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरव ठक्कर यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0