दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क : कचऱ्यातून साकारला जाणार सांस्कृतिक वारसा

नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांच्या स्मृतींना अभिवादन करत कचऱ्याच्या पुनर्वापरातून ‘दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क’ उभारण्यात येणार आहे. पर्यावरण, कला, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीचा संगम साधणारा हा प्रकल्प नाशिकसाठी नवे आकर्षण ठरणार आहे.

May 25, 2026 - 20:24
 0  13
दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क : कचऱ्यातून साकारला जाणार सांस्कृतिक वारसा
दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क,

नाशिक ब्युरो : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतींना अभिवादन करत नाशिकमध्ये “दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क” उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, कला आणि सांस्कृतिक पर्यटन यांचा अनोखा संगम साधणारा हा उपक्रम नाशिक शहरासाठी भविष्यातील महत्त्वाचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात शहरातील विविध प्रकारच्या टाकाऊ आणि पुनर्वापरयोग्य साहित्यांचा वापर करून आकर्षक कला स्थापत्ये उभारण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक विकासाला चालना देत “सर्क्युलर इकॉनॉमी” या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण ठरणार आहे.

या पार्कमध्ये बांधकामातील पुनर्वापरयोग्य अवशेष, प्लास्टिक कचरा, सेंद्रिय उपपदार्थ तसेच शहरातील इतर टाकाऊ साहित्यांचा वापर करून टिकाऊ आणि कलात्मक संरचना उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर होणारा ताण कमी होण्यास मदत होणार असून पुनर्वापर संस्कृतीलाही प्रोत्साहन मिळणार आहे.

प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच नाशिकमध्ये आधुनिक सांस्कृतिक आणि मनोरंजन केंद्र उभे राहणार आहे. पार्कमध्ये खुल्या जागेतील कलादालने, सर्जनशील कला स्थापत्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा, कुटुंबांसाठी मनोरंजन सुविधा तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिक कलाकार, कारागीर आणि युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक रोजगारनिर्मितीसह सामाजिक सहभाग वाढविण्यातही हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

प्रकल्पाचा आर्थिक आराखडा

घटक

रक्कम

एकूण प्रकल्प खर्च

₹६.३७ कोटी

पीपीपी (PPP) हिस्सा

₹१.२७ कोटी

महापालिका / राज्य हिस्सा

₹३.५१ कोटी

यूसीएफ हिस्सा (२५%)

₹१.५९ कोटी

महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितले की, पूर्वी अशा प्रकारचे उपक्रम चार ते पाच महिन्यांच्या मर्यादित कालावधीपुरते प्रभावी ठरत होते. मात्र, ‘दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क’ दीर्घकालीन दृष्टीकोनातून विकसित करण्यात येत असून तो पुढील २० वर्षे टिकणारा शाश्वत प्रकल्प ठरणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, नाशिकमधील फाळके स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन असून ‘वेस्ट टू वंडर पार्क’ मान्सूननंतर नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर असून लवकरच नाशिककरांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभिनव आणि कलात्मक उद्यानाची अनुभवयात्रा घेता येणार आहे.

पर्यावरणपूरक विकास, सांस्कृतिक जतन आणि पर्यटनवृद्धी यांचा संगम साधणारा हा प्रकल्प नाशिकच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0