भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक; मुंबईत उभारणार ‘सायप्रस ट्रेड सेंटर’
सायप्रस-भारत बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारण्याची घोषणा केली.
मुंबई, दि. २१ : भारत आणि सायप्रस यांच्यातील आर्थिक भागीदारीसाठी आगामी दशक अत्यंत निर्णायक ठरणार असून सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस येथे आयोजित ‘सायप्रस-भारत बिझनेस फोरम’मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सह सचिव जय प्रकाश शिवहरे, फिक्कीचे उपाध्यक्ष विजय संकर, सीआयआयचे अध्यक्ष बी. थियागर्जन, सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्टाव्रोस स्टाव्रू आणि इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष इव्हजेनिअस इव्हजेनिऊ उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांचे संबंध केवळ भौगोलिक मर्यादांवर आधारित नाहीत, तर लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय सहअस्तित्वाच्या समान मूल्यांवर आधारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२५ मधील सायप्रस दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याला नवी गती मिळाली आहे.
महाराष्ट्र हे सध्या ६६० अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात राज्याचा सुमारे ३० टक्के आणि परकीय गुंतवणुकीत ४० टक्के वाटा आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र ९३ गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी ५२ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटीसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्पही राज्यात विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची ताकद असून भारत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल.
फिनटेक, डिजिटल व्यवहार, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ स्थापन करण्याची घोषणा केली. हे केंद्र १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून भारतीय कंपन्यांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंधांना आता “स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतीय उद्योगांना सायप्रसमधील आणि युरोपियन बाजारपेठेतील गुंतवणूक संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ट्रेड सेंटर प्रभावी व्यासपीठ ठरेल.
सायप्रस हे युरोपियन युनियन आणि युरोझोनमधील सदस्य राष्ट्र असून सुमारे ४५ कोटी ग्राहकांच्या बाजारपेठेचे प्रवेशद्वार आहे. कमी कॉर्पोरेट कर, पारदर्शक नियमावली आणि इंग्रजी आधारित कायदेशीर व्यवस्था यामुळे भारतीय उद्योगांसाठी सायप्रस आकर्षक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सागरी सेवा या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय भारत-सायप्रस दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
या बिझनेस फोरममध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यामध्ये उद्योग सहकार्य, गुंतवणूक प्रोत्साहन, औद्योगिक विकास, बँकिंग सहकार्य, संरक्षण आणि अवकाश उद्योग तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीचा समावेश आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

