महापौर चषक स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “महापौर चषक २०२६-२०२७” राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देत युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रीडा क्षेत्रातील प्रगती, २०३६ ऑलिम्पिकची तयारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून महापौर चषकासारख्या स्पर्धांमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. अशा स्पर्धा केवळ खेळापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर शिस्त, नेतृत्व आणि संघभावना घडविण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित “महापौर चषक २०२६-२०२७” राज्यस्तरीय स्पर्धेला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला तसेच खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्या उमा खापरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महिला बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य शाम जगताप, मंदार देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारत क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून २०३६ पर्यंत देश ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास सक्षम होईल. यासाठी देशभरात अत्याधुनिक क्रीडांगणे, प्रशिक्षण केंद्रे आणि आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत.
यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बॉक्सिंग क्षेत्रातील विजय यादव, सायकलिंगपटू मीनाक्षी शिंदे, पॅरा जलतरणपटू वैष्णवी जगताप तसेच कबड्डीपटू विराज लांडगे यांचा गौरव करण्यात आला.
आमदार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरातील क्रीडा संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महापौर रवि लांडगे यांनी शहरातील युवकांना दर्जेदार क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0