बनावट लेटरहेडवर रेल्वे तिकीट विक्रीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक

मुंबईतील मलबार हिल पोलिसांनी बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करून रेल्वे तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, सिम कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि रेल्वे बुकिंगशी संबंधित गोपनीय माहिती जप्त करण्यात आली.

Jul 30, 2026 - 19:37
 0  10
बनावट लेटरहेडवर रेल्वे तिकीट विक्रीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक
बनावट लेटरहेड, रेल्वे तिकीट काळाबाजार, मलबार हिल पोलीस,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. 30 : बनावट लेटरहेड तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट शिक्क्यांचा वापर करत रेल्वे तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मलबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबई परिसरातून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिम कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड तसेच रेल्वे बुकिंगशी संबंधित गोपनीय माहितीचा डेटा जप्त करण्यात आला आहे.

मलबार हिल पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात येत होता. या बनावट कागदपत्रांच्या आधारे रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकार करून तिकिटांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे यासंबंधीच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा सखोल आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान बनावट लेटरहेड तसेच इतर बनावट साहित्य तयार करून त्याचा वापर करणाऱ्या आरोपींचा उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबई परिसरात शोध घेण्यात आला. त्यानंतर या आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आली.

तपासात अटक आरोपींपैकी काही आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एका आरोपीविरुद्ध मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आरोपींकडून 12 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 18 सिम कार्ड, 70 क्रेडिट व डेबिट कार्ड, 400 हून अधिक व्यक्तींचा रेल्वे बुकिंगशी संबंधित गोपनीय माहितीचा डेटाबेस, दोन बनावट शिक्के, पाच आधार कार्ड तसेच दोन स्टॅम्प पॅड असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून रेल्वे तिकिटांच्या बेकायदेशीर विक्रीत आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच या टोळीचे जाळे किती व्यापक आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त रागसुधा आर. तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिनकर विटवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत बकाण, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अक्षय धोंगडे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी तांत्रिक तपास करून ही कारवाई यशस्वी केली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.