मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती जाहीर; म्हाडाचे रहिवाशांना तातडीचे आवाहन

म्हाडाच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात मुंबई शहर बेटावरील ८२ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून रहिवाशांनी तातडीने सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

May 29, 2026 - 23:18
 0  4
मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती जाहीर; म्हाडाचे रहिवाशांना तातडीचे आवाहन
म्हाडा, अतिधोकादायक इमारती, मुंबई पावसाळा,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने पावसाळ्यापूर्व सर्वेक्षण पूर्ण करत मुंबई शहर बेटावरील ८२ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतींमध्ये मागील वर्षी धोकादायक घोषित करण्यात आलेल्या ४३ इमारतींचाही समावेश आहे.

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, या ८२ इमारतींमध्ये एकूण २७३६ भाडेकरू व रहिवासी राहत असून त्यामध्ये २२५६ निवासी आणि ४८० अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे. मंडळाकडून १७६ निवासी गाळेधारकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यापैकी २९ भाडेकरू मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले असून ३६ रहिवाशांनी स्वतः पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे. उर्वरित रहिवाशांना देखील निष्कासनाच्या सूचना देण्यात आल्या असून संक्रमण शिबिरात स्थलांतरासाठी मंडळाकडून आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

म्हाडाने स्पष्ट केले की, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

दरम्यान, म्हाडाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून इमारतींमध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म्हाडाच्या यादीत गिरगाव, दादर, माझगाव, कामाठीपुरा, मौलाना आझाद रोड, जे. एस. एस. रोड, व्ही. पी. रोड, एलफिन्स्टन रोड, शिवाजी पार्क परिसरासह दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या इमारतींचा समावेश आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क:

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ नियंत्रण कक्ष

रजनी महल, ताडदेव रोड, मुंबई – ४०००३४

दूरध्वनी : २३५३६९४५ / २३५१७४२३

मोबाईल : ९३२१६३७६९९

मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्ष

पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई

दूरध्वनी : २२६९४७२५ / २२६९४७२७

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0