म्हाडाची राज्यव्यापी वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेला प्रारंभ; एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
पर्यावरण संवर्धनासाठी म्हाडाने राज्यभरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेला सुरुवात केली असून यंदा एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वांद्रे येथील मुख्यालयात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते बहावा वृक्षांची लागवड करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई | ब्यूरो अनिल सावरे
वाढते शहरीकरण, हवामान बदल, प्रदूषण आणि तापमानवाढ या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम राबविणार असून, यंदा एक लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जुलै महिन्यात साजऱ्या होत असलेल्या वन महोत्सव सप्ताहानिमित्त या राज्यव्यापी मोहिमेला उत्साहात प्रारंभ झाला.
वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ३० बहावा वृक्षांची लागवड करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम पंचमहाभूते फाऊंडेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. याचवेळी मुख्यालय परिसरात पक्षी आणि प्राण्यांसाठी चार ठिकाणी पाण्याची भांडी व अन्नपात्रे उपलब्ध करून देत 'जलसेवा' उपक्रमालाही सुरुवात करण्यात आली.
मुख्यालय परिसर होणार 'ग्रीन लंग्स'
यावेळी बोलताना संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, साडेतीन वर्षे वयाच्या बहावा वृक्षांची लागवड केल्यामुळे भविष्यात मुख्यालय परिसरात पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर परागीकरण करणाऱ्या जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण होईल. या वृक्षांमुळे दरवर्षी ३,००० किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड शोषले जाईल आणि सुमारे १५,००० किलो ऑक्सिजनची निर्मिती होईल. त्यामुळे म्हाडा मुख्यालय परिसर वांद्रे परिसरातील 'ग्रीन लंग्स' म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण
उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी वृक्षारोपण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.
नाशिक मंडळ – आतापर्यंत सुमारे १०,००० वृक्षांची लागवड
कोकण मंडळ – विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुमारे ४,००० वृक्ष
पुणे मंडळ – पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३,००० वृक्ष
नागपूर मंडळ – वडधामना व म्हाडा सिटी प्रकल्पात सुमारे १,००० वृक्ष
छत्रपती संभाजीनगर मंडळ – प्रारंभी ५०० वृक्ष, पुढील आठवड्यात १०,०५० वृक्ष लागवडीचे नियोजन
मुंबई मंडळ – ४,००० वृक्षांचे उद्दिष्ट, आतापर्यंत ५०० वृक्षांची लागवड
देशी प्रजाती आणि मियावाकी वनांवर भर
या मोहिमेत स्थानिक हवामानाला अनुरूप देशी प्रजातींची, फळझाडांची, ५ ते ६ फूट उंचीची आणि २ ते ३ वर्षे वयाची निरोगी रोपे लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. जैवविविधतेचे संवर्धन, कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी अनुपयुक्त असलेल्या म्हाडाच्या भूखंडांवर मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी वने विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कमी जागेत अधिक वृक्षसंख्या आणि समृद्ध जैवविविधता निर्माण करण्यासाठी ही पद्धत प्रभावी मानली जाते.
प्रत्येक वृक्षाचे होणार जिओ-टॅगिंग
म्हाडा यंदाच्या मोहिमेत लागवड करण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंग करणार आहे. त्यामुळे झाडांच्या वाढीचा आणि संवर्धनाचा नियमित आढावा घेणे शक्य होणार आहे. तसेच झाडांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी स्वयंसेवी संस्था, रहिवासी संघटना आणि स्थानिक गृहनिर्माण संस्थांना देण्याचाही विचार सुरू आहे.
गेल्या वर्षीची मोहिम ठरली यशस्वी
मागील वर्षी म्हाडाने राज्यभरात सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी सुमारे ८० टक्के वृक्ष आजही अस्तित्वात असून १ लाख १४ हजार ८०० झाडांचे यशस्वी जिओ-टॅगिंग करण्यात आले आहे. या यशस्वी अनुभवाच्या आधारे यंदाची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
म्हाडाच्या या उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, रहिवासी संघटना, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जाणार असून, राज्यभर अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी परिसर निर्माण करण्याचा संकल्प म्हाडाने केला आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0