जिल्हा परिषद सदस्यांना लवकरच समाधानकारक निधी; विकासकामांना गती देणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांसाठी लवकरच समाधानकारक निधी वितरित केला जाईल, अशी घोषणा वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सेवा सप्ताहानिमित्त विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

Jul 28, 2026 - 00:55
 0  12
जिल्हा परिषद सदस्यांना लवकरच समाधानकारक निधी; विकासकामांना गती देणार – मंत्री हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा परिषद, प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषद निधी, सेवा सप्ताह,

कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : जिल्हा परिषद सदस्य हे देखील लोकप्रतिनिधी असून त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी समाधानकारक निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत बैठक घेऊन निधी वितरणाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात वैरण बियाणे वाटप तसेच विविध वैयक्तिक लाभ योजनांतील साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिका नांदेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, अर्थ व शिक्षण समिती सभापती शितल यादव, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील तसेच बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले की, स्वर्गीय अजित पवार यांना कोल्हापूर जिल्ह्याविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प मार्गी लागले. कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा पाइपलाइन योजना राबविण्यात आली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेला सुमारे ₹500 कोटींचा आगाऊ निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विविध योजनांतील लाभार्थ्यांना उच्च प्रतीचे मका व ज्वारी बियाणे, दळणयंत्र, शिलाई मशिन्स, कडबाकुट्टी मशिन्स, स्प्रे पंप, विद्यार्थ्यांना सायकली, लॅपटॉप, झेरॉक्स मशिन्स तसेच इतर अनेक लोकोपयोगी साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी प्रास्ताविक केले. तर बांधकाम व आरोग्य सभापती सरिका नांदेकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सदस्य, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेला शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाहीही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0