मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणार; संगीत वारशाला जागतिक ओळख देण्याचा शासनाचा प्रयत्न

मिरजच्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

Jul 29, 2026 - 16:06
Jul 29, 2026 - 16:07
 0  4
मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणार; संगीत वारशाला जागतिक ओळख देण्याचा शासनाचा प्रयत्न
मिरज म्युझिक हेरिटेज पार्क, आशिष शेलार,

मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे 

दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेचे जतन व जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यावर भर

मुंबई, दि. २८ : देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरजच्या समृद्ध संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित संस्थांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मिरजच्या संगीत वारशाच्या जतनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त बी. टी. यशवंते तसेच मिरज येथील तंतुवाद्य निर्माते आणि पारंपरिक कारागीर उपस्थित होते.

मिरज ही वैद्यकीय नगरी म्हणून ओळखली जात असली तरी देशातील महत्त्वाची संगीतनगरी म्हणूनही तिची स्वतंत्र ओळख आहे. मिरजमध्ये दोनशे वर्षांहून अधिक काळापासून तंतुवाद्य निर्मितीची समृद्ध परंपरा जपली जात आहे. सध्या सुमारे २०० कुटुंबे पारंपरिक हस्तकलेच्या माध्यमातून सितार, तानपुरा, सुरबहार, दिलरुबा, मयुरी वीणा आदी तंतुवाद्यांची निर्मिती करीत आहेत.

या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे मिरजच्या पारंपरिक तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला नवी ऊर्जा मिळण्याबरोबरच स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

प्रस्तावित ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’मध्ये आधुनिक तंतुवाद्य निर्मिती केंद्र, विशेष वाद्य संग्रहालय, प्रदर्शन दालन, परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर, संगीत इतिहासाचे दस्तावेजीकरण आणि संशोधन सुविधा उभारण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या. याशिवाय कलाकार आणि नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच नियमित संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सुविधाही या प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले.

मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा व्यापक सांस्कृतिक प्रकल्प ठरेल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून संग्रहालयाची संकल्पना, वाद्य वारसा संवर्धन, संगीत महोत्सवांचे आयोजन, संकल्पनात्मक आराखडा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, निधी आणि पायाभूत सुविधांचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या स्तरावर करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्पाचे सादरीकरण, जागेची उपलब्धता, निधीचे नियोजन आणि प्राथमिक आराखडा निश्चित करावा, असे ॲड. शेलार यांनी सांगितले.

मिरजच्या पारंपरिक संगीत वारशाचे संवर्धन करून त्याला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक संस्था आणि तंतुवाद्य निर्माते यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.